तालिबानला अफगाणी लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांचे आव्हान

काबुल – तालिबानच्या राजवटीला अफगाणिस्तानातील काराभरासाठी एक वर्षाची मुदत देण्याचे आम्ही ठरवले होते. पण गेल्या आठ महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. ते पाहता यापुढे तालिबानचे राज्य सहन करता येणार नाही. म्हणूनच मी व माझ्या सहकाऱ्यांनी तालिबानच्या विरोधात शस्त्रे उचलण्याचा निर्णयघेतला आहे. अफगाणिस्तान पुन्हा स्वतंत्र केल्याखेरीज हा लढा थांबणार नाही, अशी घोषणा अफगाणी लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल सामी सदात यांनी केली.

अनेक मुद्यांवर तालिबानच्या गटांमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे. हे मतभेद तीव्र होत असतानाच, अफगाणी लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती ले. जनरल सामी सदात यांनी तालिबानच्या विरोधात शस्त्रे उचलण्याचे जाहीर केले. तालिबानची राजवट जुलमी असून या राजवटीत अफगाणिस्तानची अधोगती होत आहे. अफगाणी लष्कराचे जवान, अधिकारी तसेच महिला, विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असताना, मी व माझे सहकारी स्वस्थ बसू शकत नाही. अफगाणिस्तान तालिबानपासून स्वतंत्र करून पुन्हा एकदा देशात लोकशाही प्रस्थापित करणे, हे आमचे ध्येय असेल. तसे होईपर्यंत आमचा लढा सुरू राहिल, असे ले. जनरल सदात यांनी जाहीर केले.

नव्या संघर्षामुळे अफगाणिस्तानात पुन्हा रक्तपात सुरू होऊ शकतो, हा धोका पत्करूनही तुम्ही तालिबानशी संघर्ष करणार का, असा प्रश्न या मुलाखतीत ले. जनरल सदात यांना विचारण्यात आला होता. मात्र अफगणिस्तानात सध्या शांतता नांदत नाही, असे सदात म्हणाले. तसेच तालिबानला लष्करी आव्हान दिल्याखेरीज अफगाणिस्तानला भवितव्य असू शकत नाही, असे सदात यांनी ठासून सांगितले. त्याचवेळी तालिबानमधील उदार गटाचे आपण स्वागत करू, त्यांनी आमच्या या लढ्यात सहभागी व्हावे. कारण आमचा विरोध तालिबानला नसून त्यांच्या कार्यपद्धतीला आहे, असा दावा ले. जनरल सदात यांनी केला आहे.

देशावर प्रेम करणारे अफगाणी स्वतःहून पुढे येऊन आम्हाला या लढ्यासाठी संपत्ती देत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर आपण संघर्ष करणार असल्याची माहिती यावेळी सदात यांनी दिली. त्याचवेळी तालिबानला अफगाणिस्तानात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी अवधी द्या, हा सल्ला देणाऱ्या पाश्चिमात्यांवर सदात यांनी सडकून टीका केली. दूर राहून असे सल्ले देणे सोपे असते. पण तालिबानचे अत्याचार सहन करणे ही अगदी वेगळी बाब ठरते, अशी टीका सदात यांनी केली आहे. सदात यांच्या या दाव्यामुळे अफगाणिस्तानात आणखी एका संघर्षाला तोंड फुटणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

तालिबानच्या आक्रमणानंतर विखुरलेल्या अफगाणी लष्करामध्ये पुन्हा एकजूट झाली आणि तालिबानविरोधी गटांकडून त्यांना समर्थन मिळाले, तर तालिबानची राजवट धोक्यात येऊ शकते. किंवा या राजवटीसमोर आव्हान उभे राहिले तरी त्याचे फार मोठे पडसाद अफगाणिस्तान व शेजारी देशांमध्ये उमटू शकतात.

leave a reply