इराकमधील तुर्कीच्या कारवाईत पीकेकेचे 56 दहशतवादी ठार

इस्तंबूल – इराकच्या उत्तरेकडील भागात तुर्कीने केलेल्या कारवाईत पीकेकेचे 56 दहशतवादी ठार झाले. तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलूसी अकार यांनी ही माहिती दिली. या कारवाईसह तुर्कीने इराकमधील आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याचे संरक्षण मंत्री अकार यांनी सांगितले. दरम्यान, या घोषणेला काही तास उलटत नाही तोच, इराकमधील तुर्कीच्या लष्करी तळावर चार कत्युशा रॉकेटचे हल्ले झाले.

पीकेकेचे 56 दहशतवादी ठारगेल्या काही दिवसांपासून तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील भागात मोठी लष्करी कारवाई सुरू केली होती. सार्या जगाचे लक्ष युक्रेनमधील युद्धावर लागलेले असताना तुर्कीने इराकमध्ये सैन्य घुसवले. ‘ऑपरेशन क्लॉ लॉक’ या लष्करी मोहिमेअंतर्गत तुर्कीचे स्पेशल फोर्सेस व लष्कराने इराकमध्ये‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ या कुर्द बंडखोरांच्या संघटनेला लक्ष्य करण्यास सुरू केले आहे. पीकेकेच्या बंडखोरांनी तुर्कीवर मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती, असा ठपका ठेवून तुर्कीने ही मोहीम छेडली आहे.

आतापर्यंतच्या कारवाईत उत्तर इराकमधील भूभाग पीकेके दहशतवाद्यांपासून मुक्त झाल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. यामध्ये 56 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाल्याचे संरक्षणमंत्री अकार यांनी जाहीर केले. जानेवारी 2022 पासून 1,819 दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. तुर्कीसाठी धोकादायक ठरणारे दहशतवादी कुठेही सुरक्षित राहू शकत नाहीत, असा इशारा संरक्षणमंत्री अकार यांनी दिला. तसेच इराकनंतर लवकरच सिरियातील कुर्द बंडखोरांविरोधात कारवाई छेडणार असल्याचे संकेत तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले.दरम्यान, रविवारी संध्याकाळी इराकमधील निनेवेह भागातील तुर्कीच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले झाले.

राजधानी बगदादपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाषिका लष्करी तळावर चार कत्युशा रॉकेट्स धडकले. या कत्युशा रॉकेटचा वापर इराणसंलग्न दहशतवादी संघटनांकडून केला जातो. त्यामुळे तुर्कीच्या लष्करी तळावरील या हल्ल्यामागे इराकमधील इराणसंलग्न गट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

leave a reply