इमॅन्युअल मॅक्रॉन सलग दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी

पॅरिस – दांभिक डावी विचारसरणी व कट्टरपंथियांच्या कारवायांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांची सलग दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रविवारी झालेल्या मतदानात मॅक्रॉन यांना 58.55 टक्के तर प्रतिस्पर्धी मरिन ले पेन यांना 41.45 टक्के मते मिळाली. तब्बल दोन दशकांनंतर फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या नेत्याला सलग दुसऱ्यांदा पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. मॅक्रॉन यांच्या विजयाचे युरोपिय देशांसहअमेरिका, रशिया व भारताने स्वागत केले आहे.

इमॅन्युअल मॅक्रॉनयापूर्वी 2017 साली झालेल्या निवडणुकीत मॅक्रॉन यांनी ‘सेंटर राईट’ अशा स्वरुपाची विचारसरणी असणारा नवा पक्ष स्थापन करून अनपेक्षितरित्या राष्ट्राध्यक्षपद मिळविले होते. त्यांच्या विजयामागे जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासह युरोपिय महासंघाने मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. राष्ट्राध्यक्षपदापाठोपाठ आपल्या नव्या पक्षाला संसदेत विजय मिळवून देण्यातही मॅक्रॉन यशस्वी ठरले होते. त्यानंतर सुरुवातीच्या कालावधीत आपला प्रभाव निर्माण करण्यात मॅक्रॉन अपयशी ठरले होते.

मात्र फ्रान्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले व दांभिक डाव्या विचारसरणीचा प्रभाव या मुद्यांवर मॅक्रॉन यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी कोरोनाची साथ व आर्थिक मंदीच्या वातावरणात इतर देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये फारशी पडझड होऊ न देण्यात ते यशस्वी ठरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका व रशिया या दोन्ही देशांबाबत ठाम धोरण राबविताना युरोपचे नेतृत्त्व फ्रान्स करु शकतो, असे संकेत देण्यात मॅक्रॉन यशस्वी ठरले. या सर्वांचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळाल्याचा दावा फ्रेंच तसेच युरोपिय विश्लेषक करीत आहेत.

त्याचवेळी फ्रान्समधील उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरिन ले पेन यांना मिळालेल्या मतांकडेही विश्लेषक तसेच माध्यमे लक्ष वेधीत आहेत. आतापर्यंत फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या कोणत्याही नेत्याला मिळाली नसतील इतकी मते ले पेन यांना मिळाली आहेत. ही वाढलेली मते व फ्रान्समधील मतदारांचे झालेले धु्रवीकरण हा पेन यांना मिळालेला विजयच असल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. फ्रान्समध्ये जून महिन्यात संसदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील निकाल खऱ्या अर्थाने फ्रान्स तसेच मॅक्रॉन यांच्या दुसऱ्या टप्प्याचे भवितव्य निश्चित करणारा ठरेल, असे भाकित तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

leave a reply