बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ६० जणांचा बळी

औगादोगो – आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रातील बुर्किना फासोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान ६० जणांचा बळी गेला आहे. माली सीमेनजिक असलेल्या याटेंगा प्रांतात ही घटना घडली असून दहशतवाद्यांनी लष्करी गणवेशात येऊन हल्ला चढविल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. गेल्या १५ दिवसांमध्ये बुर्किना फासोत झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.

बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ६० जणांचा बळीशुक्रवारी याटेंगा प्रांतातील कर्मा गावात दहशतवाद्यांनी स्थानिक गावकऱ्यांना लक्ष्य केले. हल्लेखोर दहशतवाद्यांनी गावात मोठ्या प्रमाणात जाळपोळ व लुटालूट केल्याचेही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अल कायदा किंवा ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी निगडीत गटाने हा हल्ला चढविला असावा, असा दावा लष्कराकडून करण्यात आला. हल्ल्यानंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली असून अद्याप दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

बुर्किना फासोत सध्या लष्कराची सत्ता असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दहशतवादविरोधी कारवाईची घोषणा करण्यात आली होती. देशातील दहशतवादी संघटनांबरोबरच सीमेवर सक्रिय असणाऱ्या गटांनाही लक्ष्य करण्यात येईल, असे लष्कराकडून सांगण्यात आले होते. मात्र ही कारवाई सुरू होण्यापूर्वीच दहशतवादी गटांनी एकापाठोपाठ एक हल्ल्यांचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळपास दीडशे जणांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे.

leave a reply