देशात चोवीस तासात कोरोनाचे ७८,५१२ नवे रुग्ण

नवी दिल्ली – मागील २४ तासात देशात कोरोनाव्हायरसमुळे ९७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ६४,६६९ वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळपर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत ७८,५१२ नव्या रुग्णाची भर पडली असून कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांच्या पार गेली आहे. मागील २४ तासात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी जवळपास दोन तृतियांश रुग्ण सात राज्यातील आहेत. यापैकी महाराष्ट्रात २४ तासात ११,८५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर १८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

नवे रुग्ण

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवड्याभरात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. रविवार सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत देशात विक्रमी नवे रूग्ण आढळले. त्यामुळे देशात नोंदवल्या गेलेल्या कोरोनाबधितांची संख्या ३६,२१,२४५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासातल्या आढळलेल्या नव्या रुग्णापैकी ७० टक्के रुग्ण सात राज्यातील आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे २१ टक्के रुग्ण आहेत. त्याखालोखाल आंध्रप्रदेश १३ टक्के, कर्नाटक ११.२७ टक्के, तामिळनाडू ८.२७ टक्के, उत्तर प्रदेश ८.२७ टक्के, पश्चिम बंगाल ३.८५ टक्के आणि ओडिशात ३.८४ टक्के रुग्ण आढळले.

महाराष्ट्रात आज ११,८५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ११,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याचा दावा केला जातो. राज्यातील ५,७३,५५९ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात सध्या १,९४,०५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून पुढच्या काही तासात या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमध्ये या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

नवे रुग्ण

राज्य सरकारने सोमवारी ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर केली आहे. यावेळी राज्यसरकारने ई-पासची अट रद्द केली असून खासगी व मिनी बसेसना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हॉटेल आणि लॉजला पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर जिम, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, सभागृह बंद राहणार आहेत.

उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि ओडीशा या चार राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने या राज्यामध्ये उच्च स्तरीय केंद्रीय पथक पाठवण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने घेतला आहे. देशात कोरोनाच्या चाचणीला सर्वप्रथम २० जानेवारी २०२० रोजी पुण्यातल्या प्रयोगशाळेपासून सुरूवात झाली होती. तर आता ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज कोरोनाच्या चाचण्यांची क्षमता १० लाखाहून अधिक झाली आहे. दरम्यान, भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’च्या मानवी चाचणीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

leave a reply