‘वन चायना प्रिन्सिपल’ला आव्हान देणाऱ्यांना जबर किंमत मोजणे भाग पडेल

- चीनचे परराष्ट्र मंत्री 'वँग यी' यांचा इशारा

बर्लिन – ‘तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. तैवानचा मुद्दा चीनच्या अंतर्गत कारभाराचा भाग असून वन चायना प्रिन्सिपलला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्यात आली आहे. चीन व इतर देशांमधील सहकार्याचा पाया असणाऱ्या या तत्त्वाचे जर कोणी उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर तो १.४ अब्ज चिनी जनतेचा शत्रू ठरेल. अशा स्थितीत चीनची राजवट व जनताही शांत बसणार नाही. चीनविरोधी शक्तींना त्यांच्या अदूरदर्शीपणाची जबर किंमत मोजणे भाग पडेल, असा खरमरीत इशारा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी दिला. चीनचे परराष्ट्रमंत्री सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. हा दौरा सुरू असतानाच युरोपीय महासंघाचा सदस्य असणाऱ्या ‘झेक रिपब्लिक’चे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तैवान दौऱ्यावर दाखल झाले आहे. वरिष्ठ मंत्री युरोप दौऱ्यावर असतानाच, युरोपचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाल्याने चीनची राजवट चांगलीच बिथरली असून, परराष्ट्रमंत्री वँग यी यांची प्रतिक्रिया त्याचाच भाग दिसत आहे.

'वन चायना प्रिन्सिपल'

जगभरात कोरोनाची साथ फैलावत असतानाच चीन मात्र आपल्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. हॉंगकॉंगसह तिबेट व झिंजिआंगमध्ये चिनी राजवटीची जबरदस्त दडपशाही सुरू आहे. त्या वेळी साऊथ चायना सी व तैवानच्या आखातात चीनकडून आक्रमक लष्करी हालचालीही करण्यात येत आहेत. या कारवायांना आंतरराष्ट्रीय समुदायाकडून जबरदस्त विरोध होत असतानाही चीनने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपली मनमानी सुरू ठेवली आहे. त्यामुळे चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे युरोपीय देशही नाराज झाले असून ही नाराजी महासंघाकडून गेल्या काही महिन्यात वारंवार समोर आली आहे.

त्याचवेळी कोरोनाच्या साथीसह इतर मुद्द्यांवरून अमेरिकेकडून लक्ष्य झालेला चीन अमेरिकेबरोबरील तणाव कमी करण्यासाठी युरोपचा आधार घेऊ पाहत आहे. परराष्ट्रमंत्री वँग यी यांचा पाच दिवसांचा युरोप दौरा त्याचाच भाग आहे. युरोप बरोबरील आर्थिक व व्यापारी संबंध वाढविणे आणि अमेरिकेने चीनविरोधात उघडलेली जागतिक आघाडी कमकुवत करणे, हे चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचे उद्देश मानले जातात. त्यासाठी चीनने आपल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी महासंघात निर्णायक भूमिका असणाऱ्या फ्रान्स, जर्मनी व नेदरलँड या देशांची केलेली निवडही लक्ष वेधून घेणारी ठरते. आपल्या फ्रान्स भेटीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडताना, चीनला नवे शीतयुद्ध नको असून अमेरिकेतील काही आक्रमक गट त्यासाठी हालचाली करीत असल्याचा आरोप केला. त्याचवेळी युरोप तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

'वन चायना प्रिन्सिपल'

मात्र चीनकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना फारसे यश मिळणार नसल्याचे फ्रेंच परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य आणि झेक शिष्टमंडळाच्या तैवान दौऱ्यातून स्पष्ट झाले. चिनी परराष्ट्रमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत, आपण उघुरवंशीयांवरील अत्याचाराचा तसेच हॉंगकॉंगमधील कायद्याचा मुद्दा उपस्थित केला, अशी माहिती फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस ले ड्रीअन यांनी दिली. फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेली ही माहिती चीनला चांगलीच अडचणीत आणणारी ठरली असून त्यानंतर चीनकडून सारवासारव करण्याचे प्रयत्नही झाले. त्याचवेळी तैवानमध्येही झेक रिपब्लिक व तैवानमध्ये आर्थिक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन परस्पर सामंजस्य करार पार पडल्याची माहिती जाहीर करण्यात आली.

फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले वक्तव्य आणि झेक रिपब्लिकच्या शिष्टमंडळाचा दौरा यातून युरोपीय महासंघाने चीनविरोधात असलेली आपली नाराजी पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे मानले जाते. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीन व युरोपमधील संबंध पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता मावळल्याचे दिसत आहे.

leave a reply