वॉशिंग्टन – जर कोरोनाची साथ चीनच्या वुहानमधून पसरविण्यात आल्याचे सिद्ध झाले, तर अमेरिकेने चीनवर कठोर कारवाई करायलाच हवी, अशी मागणी 83 टक्के अमेरिकन नागरिक करीत आहेत. नुकत्याच केलेल्या एका पाहणीत ही बाब स्पष्ट झाली. अमेरिकेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बहुसंख्य मतदारांचे या मागणीवर एकमत आहे. कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या आर्थिक हानीची भरपाई करण्यासाठी चीनच्या उत्पादनांवर मोठा कर लादण्याच्या प्रस्तावाला काही मतदारांनी समर्थन दिले. तर कोरोनामुळे निधन झालेल्या व या साथीची बाधा झालेल्या प्रत्येकाला चीनकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही काही मतदारांनी उचलून धरली आहे.
पाश्चिमात्य माध्यमांमध्ये कोरोनाच्या साथीबाबत धक्कादायक माहिती प्रसिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे ही साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली, हा संशय अधिकाधिक प्रमाणात बळावत चालला आहे. काहीजणांची तर तशी खात्रीच पटल्याचे दिसत आहे. ‘द हिल-हॅरिसएक्स’ने केलेल्या पाहणीत अमेरिकी मतदारांमध्ये चीनबाबत संशयाची भावना असल्याचे उघड झाले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सुमारे 87 टक्के मतदारांनी तर सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या 83 टक्के मतदारांनी व या दोन्ही पक्षांपेक्षा वेगळा तटस्थ गट असलेल्या मतदारांनी 80 टक्के इतक्या प्रमाणात चीनवरील कारवाईचे समर्थन केले.
कोरोनाची साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली असेल तर अमेरिकेने चीनवर कठोर कारवाई करायलाच हवी, असे या मतदारांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर या भयंकर अपराधासाठी चीनच्या उत्पादनांवर जागतिक पातळीवर कर लादण्यात यावा, असे 30 टक्के मतदारांनी म्हटले आहे. तर 25 टक्के मतदार चीनकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी, अशी मागणी करीत आहेत. 18 टक्के मतदारांनी चीनवर आर्थिक निर्बंध लादून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर प्रवासबंदी लागू करावी, अशी आक्रमक मागणी केली आहे.
कोरोनाची साथ नैसर्गिक असून यासाठी चीनच्या विरोधात कारवाईची गरज नसल्याचे मानणार्यांची संख्या 15 टक्के इतकी आहे. पण चीनवर कारवाईचे समर्थन करणार्यांची संख्या 80 टक्क्याहून अधिक असून याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या मतदारांचे एकमत ही फार मोठी बाब ठरते. मात्र हे सारे मतदार चीनचा अपराध सिद्ध झाल्यानंतरच ही कारवाई व्हावी, असे मत व्यक्त करीत आहेत, अशी माहिती ‘द हिल-हॅरिसएक्स’चे सीईओ ‘ड्रिटान नेशो’ यांनी दिली. सध्या चीनकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची व चिनी उत्पादनांवर अधिक कर लादण्याची मागणी करणारे मतदार 25 ते 30 टक्क्यांच्या आसपास आहेत. पण कोरोनाची साथ चीनने कारस्थान करून पसरविल्याचे उघड झाल्यास, या कारवाईचे समर्थन करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल.
अमेरिकेचे विरोधी पक्षनेते कोरोनाच्या मुद्यावर चीनवर गंभीर आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांना अमेरिकेत व अमेरिकेच्या बाहेर मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. याची धग चीनला जाणवू लागली आहे. अशा परिस्थिती चीनवर कठोर कारवाईची अमेरिकन मतदारांनी केलेली मागणी चीनवरील दडपण अधिकच वाढविणारी ठरते आहे.