देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७० हजारांवर

- पंतप्रधानांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी संपत आला आहे. त्याचवेळी या साथीच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाव्हायरसची साथ रोखण्याचे प्रयत्न व अर्थव्यवहाराला गती देण्यासाठी समतोल धोरण स्विकारायला हवे, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. यावेळी काही राज्यांच्या मुखमंत्र्यांनी देशात प्रवासी रेल्वे सेवा इतक्यात सुरु करू नये, अशी सूचना केली आहे.

देशात कोरोनाने २२०६ जण दगावल्याची आणि एकूण रुग्ण संख्या ६७,१५२ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. चोवीस तासात ४२०० हून अधिक रुग्ण आढळले. मात्र ही ,माहिती सॊमवारी सकाळपर्यंतच्या नोंदीवर आधारलेली आहे. प्रत्यक्षात सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत देशातील रुग्णांची संख्या ७० हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते. सोमवारी महाराष्ट्रात ३६ जणांचा बळी गेला, तर १,२३० नवे रुग्ण आढळले. त्यामुळॆ राज्यातील एकूणरुग्ण संख्या २३,४०० वर पोहोचली आहे. दिवसभरात मुंबईत २० जणांचा बळी गेला, तर ७९१ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत ७९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये २० जण दगावले, तर ३५० नवे रुग्ण आढळले. यातील १९ जण अहमदाबाद शहरात दगावले आहेत. दिल्लीतही ३०० नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात काही ठिकाणी तुलनेत रुग्ण संख्येत मोठी वाढ दिसून आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. या भागात सामुदायिक संक्रमण होऊ नये यासाठी हॉटस्पॉट असलेल्या ठिकांणांकडे अधिक लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे अग्रवाल म्हणाले. तसेच नागरिकांना कोरोनाची काही लक्षणे जाणवली तर ती लपवू नका, त्याची त्वरित माहिती द्या, असे आवाहनही अग्रवाल यांनी केले.

सोमवारी पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. १७ मे रोजी लॉकडाउनचा कालावधी संपत असून त्याआधी पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा महत्वाची ठरते. यावेळी कोरोनाची साथ रोखण्यासाठी खबरदारीचे पालन करून आर्थिक व्यवहारांना गती देण्याच्या समतोल धोरणावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. राज्यांच्याही आर्थिक सशक्तीकरणाचा विचार करून लॉकडाऊनविषयी निर्णय घ्यावा असे काही राज्यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण वाढत असताना देशात प्रवासी रेल्वे चालविल्या जाऊ नये,असा सल्लाही काही राज्यांनी दिला.

दरम्यान महाराष्ट्रात रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे आणि सहा लाख कामगार कामावर रुजू झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

leave a reply