काश्मीरसाठी पाकिस्तानने थेट भारतावर हल्ला चढवावा – पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानाची मागणी

मिरपूर – ‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आहे तीच भूमिका कायम ठेवली तर पुढची ७०० वर्षेही काश्मीरच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. तेव्हा इम्रान यांनी शाब्दिक बुडबुडे काढण्यापेक्षा थेट भारतावर हल्ले चढवावे’, अशी मागणी पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे (पीओके) पंतप्रधान राजा फारुक हैदर यांनी केली. भारत पाकिस्तानव्याप्त काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान ताब्यात घेण्यासाठी हल्ल्याच्या तयारीत आहे, अशी जोरदार चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीओके’च्या पंतप्रधानांनी केलेली मागणी म्हणजे निव्वळ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड असल्याचे दिसते.

पाकिस्तानचे लष्कर आणि कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या हातातील बाहुले असलेल्या राजा फारुक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. ‘इम्रान यांनी शाब्दिक प्रतिक्रिया देणे थांबवून थेट कारवाई करावी’, अशी मागणी हैदर यांनी केली. त्याचबरोबर भारताने ‘गिलगिट बाल्टिस्तान’मधील हवामानाची माहिती देण्यास सुरुवात केली असेल तर पाकिस्तानने देखील नवी दिल्लीच्या हवामानाचे तपशील द्यावेत, असे हास्यास्पद विधान हैदर यांनी केले आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मागे घेतले. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारकडून काश्मीरसाठी अत्यंत आक्रमक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा पाकिस्तानातील कट्टरपंथी व्यक्त करीत होते. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत काश्मीरवर भाषण ठोकण्याच्या पलीकडे इम्रान खान काहीही करू शकलेले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे भारताने जम्मू-काश्मीरवरील आपली पकड अधिकच भक्कम केली आणि आता भारत ‘पीओके’सह गिलगिट बाल्टिस्तान ही ताब्यात घेण्याच्या तयारीला लागला आहे, अशी खंत पाकिस्तानातील कट्टरपंथीच नाहीतर दहशतवादी संघटनांचे नेते ही व्यक्त करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याने, ‘दुश्मन का पलड़ा भारी है’, अशा शब्दात आपल्या अगतिकतेची कबुली दिली होती. तसेच पाकिस्तानच्या सरकारचे बोटचेपे धोरण याला जबाबदार असल्याचे खापरही सलाउद्दीन याने फोडले होते.

दहशतवादी हल्ल्याचा बनाव करून भारत कुठल्याही क्षणी ‘पीओके’वर हल्ला चढवेल, असा इशारा इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला होता. जर हे खरे असेल तर भारताच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी इम्रान खान यांनी काय तयारी केली ते सांगावे, अशी जळजळीत टीका पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. भारताच्या आक्रमक राजनैतिक व लष्करी धोरणासमोर पाकिस्तान पूर्णपणे निष्प्रभ ठरला असून या अपयशाची जबाबदारी इम्रान खान यांनी स्वीकारली पाहिजे, असे या देशाचे माजी लष्करी अधिकारी सांगू लागले आहेत. पाकिस्तानचे लष्करही इम्रान खान यांच्यावर कमालीचे नाराज असून राजा फारूक हैदर यांच्यासारखे पाकिस्तानी लष्कराचे बाहुले मानले जाणारे नेते व इतर कट्टरपंथीय इमरान खान यांच्यावर करीत असलेली टीका हेच दाखवून देत आहे.

राजा फारूक हैदर, पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे भारतावर हल्ला चढविण्याची मागणी करीत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी इमरान खान यांच्यावर हल्ला चढविला, असे दिसत आहे. कारण पाकिस्तानची धोरणे लोकनियुक्त पंतप्रधान नाहीतर या देशाचे लष्करच ठरवत आले आहे. पाकिस्तानच्या राजकारणाची थोडीफार जाण असलेल्या प्रत्येकाला ही बाब ठाऊक आहे. अशा परिस्थितीत, हैदर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे ही मागणी करून पाकिस्तानचे लष्कर लोकनियुक्त पंतप्रधान यांच्या आदेशावरून काम करीत असल्याचा भ्रम उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी हैदर पाकिस्तानी लष्कराचा बचाव करीत असल्याचेही समोर येत आहे.

leave a reply