टेक्सासमधील नौदल तळावर झालेला हल्ला दहशतवादी असण्याची शक्यता

अमेरिकी तपासयंत्रणा एफबीआयचा दावा

वॉशिंग्टन, (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ‘कॉर्पस क्रिस्ती’ या नौदल तळावर झालेल्या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक जखमी झाला असून हल्लेखोराला ठार करण्यात यश आले आहे. हल्लेखोर ऍडम अलसाहली सीरियन वंशाचा अमेरिकी नागरिक असून तो दहशतवादी संघटनांचा समर्थक असल्याचा संशय ‘एफबीआय’ या तपासयंत्रणेकडून करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या सहा महिन्यात संरक्षणतळावर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे.
 
गुरुवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास २० वर्षांच्या अलसाहलीने नौदल तळावर आपली गाडी घुसवली.  तळावर उभारलेल्या अडथळ्यांमुळे गाडी अडकल्याने त्याने गेटवरील सुरक्षारक्षकांवर हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर तळावर गोळीबार सुरू केला असता तैनात जवानांनी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यात हल्लेखोर अलसाहली ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने हल्ल्याची चौकशी सुरू केली असून, हल्लेखोराने सोशल मीडियावर ‘आयएस’ तसेच ‘अल कायदा’चे समर्थन केल्याचे संदर्भ मिळाले आहेत. त्यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे एफबीआयकडून सांगण्यात आले.
 
गेल्या सहा महिन्यात अमेरिकेतील संरक्षणतळावर झालेला हा दुसरा हल्ला ठरला आहे. यापूर्वी फ्लोरिडातील संरक्षणतळावर प्रशिक्षित सौदी अधिकाऱ्याने तीन अमेरिकी जवानांची हत्या केली होती. हा हल्ला दहशतवादी हल्ला होता,असे अमेरिकी यंत्रणांनी स्पष्ट केले होते

leave a reply