देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,२३००० वर

महाराष्ट्रात एका दिवसात २९४० रुग्ण आढळले

नवी दिल्ली/मुंबई, (वृत्तसंस्था) – देशात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे १४८ जण दगावले, तर ६,०८८ नवे रुग्ण आढळले.  एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. या आधी बुधवारी देशात एका दिवसात ५,६११ इतक्या नव्या रूग्णांची नोंद झाली होती.  देशातील कोरोनाच्या एकूण रूग्णांची संख्या १,१८,४४७ वर पोहोचली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जाहीर केले. मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीची रुग्णसंख्या एक लाख २३  हजारांजवळ पोहोचल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातच २,९४० इतके नवे रुग्ण आढळले.

महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि नवी दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तसेच इतर राज्यांमध्ये असलेले मजूर परतू लागल्यावर उत्तर प्रदेश आणि बिहारमधीलही या साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  शुक्रवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाने ६३ जण दगावले. तसेच २,९४० नवे रुग्ण आढळले. राज्यात चोवीस तासात नोंद झालेली कोरोनाच्या रुग्णांची ही  सर्वाधिक संख्या आहे. याआधी गुरुवारी महाराष्ट्रात  या साथीने ६४ जणांचा बळी गेला होता, तर  २,३४५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.  आतापर्यंत राज्यात या साथीने १५१७ जण दगावले आहेत आणि एकूण रूग्णांची संख्या ४५,५८२ पोहोचली आहे.  

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई देशातील कोरोनाचे सार्वधिक संक्रमण असलेले शहर बनले आहे. शुक्रवारी मुंबईत कोरोनामुळे २७ जण दगावले आणि १,७५१ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी मुंबईत कोरोनामुळे ४१ जणांचा बळी गेला होता, तर  १३८२ नवे रुग्ण आढळले होते. यामुळे मुंबईतील या साथीने दगवलेल्यांची संख्या ९०९ वर पोहोचली असून  एकूण रुग्णांची संख्या २७ हजारांवर गेली आहे.             

शुक्रवारी तमिळनाडूत ८०० नवे रुग्ण आढळले असून यातील ५६७ रुग्ण चेन्नईतील आहेत. या राज्यातील रुग्णांची संख्या १४,७५३ पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर देशात सार्वधिक रुग्ण गुजरातमध्ये आहेत.  गुजरातमधील एकूण रूग्णांची संख्या १३,२७३ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये चोवीस तासात २९ जणांचा बळी गेला तर ३६३ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिल्लीत दिवसभरात १४ जणांचा बळी गेला असून ६६० नवे रुग्ण आढळले. यामुळे दिल्लीतील एकूण रूग्णांची संख्या १२,६६० वर पोहोचली आहे. देशभरातील स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतू लागल्यानंतर या राज्यातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उत्तरप्रदेशात दिवसभरात १२७ रुग्ण आढळले. त्यामुळे या राज्यातील रुग्णसंख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. 

दरम्यान, देशात वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने ३७ ते ७८ हजार जणांचे प्राण वाचले, तसेच लॉकडाऊन केले नसते तर देशात कोरोनाचे १४ ते २९ लाख रुग्ण वाढले असते, असा दावा  निती आयोगाकडून करण्यात आला आहे. हा दावा विविध सर्वेक्षणावर आधारलेला असल्याचे सरकारने म्हटले आहे.

तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या साथीचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ४० टक्क्यांवर पोहोचला असून आतापर्यंत ४६ हजार रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू लावावा आणि अनाआवश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्यास बंदी घालावी अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी पाऊले उचलावी असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.

leave a reply