सलग दुसऱ्या दिवशी जगभरात कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण

बाल्टिमोर,  (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांची संख्या ३,३५,९७० वर पोहोचली आहे. तर जगभरात या साथीची लागण झालेल्यांची संख्या ५२ लाखांच्याही पुढे गेली असल्याची माहिती समोर येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जगभरात एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले असून ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरते. तर, या साथीतून बरे झालेल्यांची संख्या २१ लाखांच्या पुढे गेल्याची दिलासादायक माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. दरम्यान, युरोप नंतर आता लॅटिन अमेरिका या साथीचे मुख्यकेंद्र ठरत असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

जगभरातील २१२ देशांमध्ये फैलावलेल्या कोरोनाव्हायरसने गेल्या चोवीस तासात ४९०० हून अधिक जणांचा बळी घेतला असून याबरोबर जगभरात कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ३,३५,९७० वर पोहोचली आहे. जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात या साथीचे जगभरात एक लाख सात हजाराहून अधिक रुग्ण नव्याने आढळले आहेत. गुरुवारी अमेरिकेत या साथीने १२५५ जणांचा बळी गेला असून अमेरिकेतील बळींची एकूण संख्या ९६,५७१ वर पोहोचली आहे.

ब्राझिलमधील या साथीच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असून गुरुवारी या देशात १,१८८ जणांचा बळी गेला. ब्राझिलमधील एकूण बळींची संख्या वीस हजाराच्या पुढे गेली आहे. तर ब्राझिलमध्ये या साथीचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली असून गेल्या चोवीस तासात १९,९५१ नव्या रुग्णांची भर यात पडली आहे. अमेरिका आणि रशियानंतर कोरोनाचे तीन लाखाहून अधिक रुग्ण असलेला ब्राझिल हा तिसरा देश आहे. रशियामध्ये या साथीचे ८,८९४ नवे रुग्ण आढळले आहेत. रशियातील कोरोनाबाधितांची संख्या ३,२६,४४८ वर पोहोचली आहे.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे नवीन रुग्ण सापडत आहेत. या साथीचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरात कोरोनाच्या ३६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यापैकी एकतीस जणांमध्ये  कोरोनाची लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये असे एकूण २८१ रुग्ण आहेत.

leave a reply