दोन दिवस आधीच मान्सूनचे केरळात आगमन

नवी दिल्ली – शनिवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. देशात मोसमी पावसाचे आगमन दोन दिवस आधीच झाले असून मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती हवामानविषयक अंदाज वर्तविणाऱ्या ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात उन्हाच्या तीव्र झळा आणि तापमानामुळे हैराण झालेल्या देशवासियांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी मान्सून ८ दिवस उशीरा केरळमध्ये पोहोचला होता.

Keral Mansoonमान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पाऊस, ‘ओएलआर व्हॅल्यू’, वार्‍याची गती इत्यादी सर्व सुरुवातीची परिस्थिती मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. याआधी मान्सून १ जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु आयएमडीने गुरुवारी या अंदाजात बदल करत, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्याचे म्हटले होते. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर २ ते ४ जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकण गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सून ८ जूनला सुरू झाला होता. त्यामुळे उर्वरित देशात त्याचे आगमन उशिरा झाले. यंदा मात्र हंगामाच्या उत्तरार्धात पाऊस चांगला असेल अशी शक्यता वर्तवली आहे. शिवाय आयएमडीने या वर्षी पाऊस चांगला पडेल असे सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावर्षीच्या जून ते सप्टेंबर या काळात पाऊस सरासरी गाठेल असे ‘अर्थ सायन्स’ मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी म्हटले होते.

leave a reply