इस्रायल, अरब देशांमध्ये ‘कोव्हिड-१९ डिप्लोमसी’ सुरू

तेल अविव – कोरोनाव्हायरसची साथ राजनैतिक पातळीवरही फार मोठ्या उलथापालथी घडवित असल्याचे समोर येत आहे. आजवर इस्रायलशी कुठल्याही स्वरूपाचे संबंध ठेवण्यास नकार देणारी अरब आखाती देश कोरोनाची साथ आल्यानंतर इस्रायलकडून सहाय्य घेऊ लागले आहेत. इस्रायलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची माहिती उघड केली.

Israel Arab kovid19इस्रायलच्या तेल अविवमधील आघाडीचे रुग्णालय ‘शीबा मेडिकल सेंटर’चे वरिष्ठ अधिकारी ‘जोएल हार-इव्हान’ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अरब-इस्लामी देशांकडून केल्या जाणाऱ्या मागणीची माहिती दिली. ‘ज्या देशांबरोबर इस्रायलचे राजनैतिक संबंध नाहीत, अशा देशांकडून गेल्या सत्तर दिवसांमध्ये इस्रायलकडे कोरोनाबाबतच्या सहकार्याविषयी विचारणा करण्यात आली. यामध्ये संयुक्त अरब अमीरात (युएई), कुवैत, बाहरीन आणि इंडोनेशिया या इस्लामधर्मीय देशांचा समावेश आहे. तसेच इस्रायलशी राजनैतिक संबंध असलेल्या जॉर्डन, इजिप्त आणि अझरबैजान या देशांमधील व्यावसायिकांनी इस्रायलकडून कोरोनाची साथ रोखण्यासाठी सहाय्य मागितले’, अशी माहिती जोएल यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ‘युएई’चे मालवाहू विमान इस्रायलमध्ये उतरले होते, याचा दाखलाही जोएल यांनी माध्यमाशी बोलताना दिला. वेस्ट बँक आणि गाझापट्टीतील पॅलेस्टिनींसाठी वैद्यकीय सहाय्य घेऊन ‘युएई’चे विमान इस्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. कुठल्याही अरब देशाचे विमान इस्रायलमध्ये उतरणे, ही एक मोठी घटना मानली जाते. या घटनेमुळे इस्रायल आणि अरब देशांमध्ये संबंध सुधारत असल्याचा दावा जोएल यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी ‘यूएई’चा विमानाचे स्वागत केले होते. तसेच यापुढे अरब देशांमधील प्रवासी विमाने इस्रायलमध्ये उतरतील, अशी अपेक्षाही इस्रायली राजदुतांनी व्यक्त केली होती. त्याआधी गेल्या महिन्यात, मोरोक्कोमध्ये अडकलेल्या ‘युएई’च्या ७४ नागरिकांना सोडवण्यासाठी इस्रायलने प्रयत्न केले होते, याकडे जोएल यांनी लक्ष वेधले.

Arab kovid19दरम्यान, इस्रायलची प्रमुख गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने मार्च महिन्यात काही अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करून सुमारे एक लाख कोरोना टेस्टिंग किट्स उपलब्ध करुन दिल्याची माहिती इस्रायल सरकार आणि माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. इस्रायलच्या सरकारने हे अरब देश कोणते, ते उघड करण्याचे टाळले होते. पण या साथीच्या पार्श्‍वभूमीवर, आखातातील सहापैकी चार अरब देश इस्रायलच्या संपर्कात असल्याची माहिती, ‘फाउंडेशन फॉर एथनिक अंडरस्टँडिंग’ या अमेरिकेतील संघटनेचे अध्यक्ष राबी मार्क स्नेएर यांनी दिली आहे.

leave a reply