पाकिस्तानच्या भ्रष्टाचारी लष्कराकडून भारतावर हायब्रीड वॉरचे आरोप

इस्लामाबाद – भारताकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असली तरीही युद्धात पाकिस्तानच जिंकेल. पाकिस्तान शांतीप्रिय देश आहे, पण भारताने युद्ध लादल्यास पाकिस्तानचे लष्कर संहारक प्रत्युत्तर देईल, अशा नव्या धमक्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिल्या. त्याचवेळी सध्या ‘हायब्रीड युद्ध’ सुरू असून पाकिस्तानी लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे, ही बाब जनतेने ध्यानात घावी, असे जनरल बाजवा यांनी म्हणाले. पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे माध्यमांनी उघड केली असून यावर पाकिस्तानी जनता संताप व्यक्त करीत आहे. मात्र हा सारा भारताचा दुष्प्रचार असल्याचा दावा ठोकून पाकिस्तानचे लष्करप्रमुख आपली व आपल्या सहकार्‍यांची कातडी वाचवू पाहत असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानच्या भ्रष्टाचारी लष्कराकडून भारतावर हायब्रीड वॉरचे आरोप‘डायरेक्टर जनरल इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’च्या (डिजीआयएसपीआर) पदावर कार्यरत असताना, असिम सलिम बाजवा यांच्या कुटूंबाच्या नावावर परदेशात फार मोठी संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने लेफ्टनंट जनरल बाजवा यांची पत्नी व त्यांच्या मुलांचे व्यवसाय आणि गडगंज संपत्ती याची माहिती उघड करुन सर्वांना धक्का दिला. पाकिस्तानच्या सर्दन कमांडची जबाबदारी सांभाळत असताना, बाजवा यांच्या मुलांनी काही कंपन्या स्थापन केल्या आणि वडिलांच्या हुद्द्याचा वापर करुन अवैधरित्या संपत्ती कमाविली, असा आरोप सुरू झाला आहे. इतकेच नाही तर, ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी असताना, लेफ्टनंट जनरल बाजवा यांनी गैरमार्गाने प्रचंड प्रमाणात संपत्ती कमावली, याचीही चर्चा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सुरू आहे.

दुबईसह अमेरिका, कॅनडामध्ये बाजवा यांच्या कुटूंबाच्या मालमत्ता असून त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी पाकिस्तानी लष्कराशीच निगडीत असलेले काहीजण करु लागले आहेत. आपल्या विरोधात सुरू झालेल्या या टीकेला समाधानकारक उत्तर देण्याच्या ऐवजी लेफ्टनंट जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपविला. पंतप्रधान इम्रान खान यांनी हा राजीनामा नामंजूर केला व बाजवा निर्दोष असल्याचे प्रशस्तीपत्रक देऊन टाकले. पाकिस्तानचे सरकार व लष्कर हा विषय निकालात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पाकिस्तानचे लष्करी अधिकारी भ्रष्टाचार करुन प्रचंड संपत्ती कमावतात आणि पाकिस्तानच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसतात, हा आरोप आता नव्याने ऐरणीवर आला आहे. लेफ्टनंट जनरल बाजवा यांची सारी संपत्ती व गुंतवणूक परदेशात आहे, त्यांच्या मुलांच्या कंपन्याही परदेशात कार्यरत आहेत, याकडे त्यांचे टीकाकार लक्ष वेधत आहेत.

पाकिस्तानच्या भ्रष्टाचारी लष्कराकडून भारतावर हायब्रीड वॉरचे आरोपयामुळे पाकिस्तानी लष्कराची देशाच्या राजकारणातील लुडबूड व अवैध हस्तक्षेपाचा मुद्दाही चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत, लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताला युद्धाच्या धमक्या देऊन पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात भारताचा दुष्प्रचार सुरू असल्याचे दावे ठोकले आहेत. हा आधुनिक काळातील युद्धाचा अर्थात ‘हायब्रीड वॉर’चा प्रकार असून याद्वारे पाकिस्तानच्या लष्कराची बदनामी करुन अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनतेने साथ दिली तर या युद्धात पाकिस्तान नक्की विजयी ठरेल, असे जनरल बाजवा पुढे म्हणाले. पाकिस्तानी लष्कराचे गैरव्यवहार व भ्रष्टाचार तसेच सत्तेतील हस्तक्षेप, या सर्वांवर पडदा टाकण्यासाठी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नेहमीच भारतद्वेषाचा वापर केला आहे. यावेळीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी याच पर्यायाचा अवलंब केल्याचे समोर आले आहे. मात्र पाकिस्तानच्या लष्कर व सरकारने आपला प्रभाव वापरुनही हा भ्रष्टाचाराचा विषय माध्यमांमध्ये गाजत आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका स्वीकारणारे पाकिस्तानचे सरकार व लष्कर, लष्करी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा का करीत आहेत, असा सवाल काही पत्रकार व विश्लेषक करीत आहेत.

leave a reply