‘भारत माता की जय’च्या घोषात ‘एसएफएफ’च्या शहिदावर अंत्यसंस्कार

लेह – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भूसुंरुग स्फोटात शहीद झालेल्या भारताच्या ‘स्पेशल फ्रंटिअर फोर्स’चे (एसएफएफ) तिबेटियन जवान ‘निमा तेंजिन’ यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. २९-३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण क्षेत्रात भारत-चीनच्या जवानांमधील संघर्षादरम्यान हा स्फोट झाला होता. कंपनी लिडर निमा तेंजिन यांच्या अंत्यविधीवेळी हजारोंच्या संख्येने तिबेटियन समुदाय उपस्थित होता. ‘भारत माता की जय’, ‘जय तिबेट’, ‘भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान आहे’, अशा घोषणा तिबेटी समुदायाने यावेळी दिल्या.

'एसएफएफ'

‘एसएफएफ’च्या विकास बटालियन्सचे कंपनी लीडर म्हणून ‘निमा तेंजिन’ कार्यरत होते. ५१ वर्षाच्या निमा तेंजिन यांनी ३३ वर्षे ‘एसएफएफ’मध्ये राहून भारतमातेची सेवा केली. लडाखच्या चुशूलमध्ये झालेल्या भूसुरंग स्फोटात ‘निमा तेंजिन’ शहीद झाले. सोमवारी लेहमध्ये त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. भारत आणि तिबेटच्या ध्वजात त्यांचे पार्थिव ठेवले होते. तसेच भारत आणि तिबेटच्या राष्ट्रगीताने त्यांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी तिबेटी समुदायाने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच वरिष्ठ नेते राम माधव यावेळी उपस्थित होते.

‘निमा तेंजिन तिबेटचेच हिरो नाहीत. तर ते भारताचे देखील हिरो आहेत’, ते तिबेटसाठी जगले आणि भारतासाठी शहीद झाले’, अशा भावपूर्ण आशयाचे फलक लावण्यात आले होते. ‘भारत माता की जय’, ‘जय तिबेट’च्या घोषणांनी लेहचा परिसर दुमदुमून गेला होता. ‘भारत तेंजिन यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’, अशा शब्दात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पँगाँग त्सोतील संघर्षाच्या निमित्ताने ‘एसएफएफ’ची ओळख जगाला झाली आहे. १९६२ सालच्या चीनबरोबरच्या युद्धानंतर वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकार्‍यांच्या प्रस्तावानंतर ‘एसएफएफ’ची स्थापना झाली. भारतीय गुप्तचर यंत्रणेशी संलग्न असलेली ही लष्करी संघटना सिक्रेट युनिट म्हणून ओळखली जाते. हिमालयीन सिंहाचे बोधचिन्ह असणार्‍या ‘एसएफएफ’च्या सात बटालियन्स कार्यरत असून यात सात हजार जवान सक्रीय असल्याचे बोलले जाते. ही संख्या याहून अधिक असल्याचा दावाही केला जातो. ‘एसएफएफ’मध्ये प्रामुख्याने निर्वासित तिबेटियन जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराच्या ‘पॅरा स्पेशल फोर्सेस’च्या प्रशिक्षणानंतर या जवानांना पहाडी युद्धाचे तसेच अधिक खडतर युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते.

१९७१च्या बांगलादेश आणि १९९९च्या कारगिल युद्धात ‘एसएफएफ’च्या जवानांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या जवानांचे तोंडचे पाणी पळविले होते. तसेच १९८४ सालच्या ‘ऑपरेशन ब्ल्यूस्टार’मध्ये ‘एसएफएफ’च्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आता ‘एसएफएफ’चे जवान भारत-चीन सीमेवर तैनात असून संघर्षादरम्यान त्यांनी चिनी जवानांना पळवून लावले होते. यापैकी ‘एसएफएफ’ची विकास बटालियन सर्वात आक्रमक कमांडोजचे पथक म्हणून ओळखली जाते. पहाडी क्षेत्रातील युद्धात या कमांडोजचा हात धरणारा कुणीही नसल्याचे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply