हाँगकाँगमधल्या चीनविरोधी आंदोलनात भारताचा राष्ट्रध्वज झळकला

हॉंगकॉंग – गुरुवारी हाँगकाँगमध्ये ‘चायना नॅशनल डे’च्या निमित्ताने चीनच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनात हाँगकाँगमधल्या युवकाच्या हातातल्या भारतीय राष्ट्रध्वजाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. चीनविरोधात आक्रमकपणे लढणाऱ्या भारताला हे आमचे समर्थन असल्याचे या युवकाने म्हटले. लडाखच्या गलवान व्हॅलीत भारताने चीनला जबर धडा शिकविल्यानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान उंचावले आहे. त्यामुळे चीनविरोधात संघर्ष करणारे देश तसेच गटांसाठी भारत नवे आशास्थान म्हणून उदयास येत असल्याचे हॉंगकॉंगमधील घटनेवरून दिसून येते.

हाँगकाँगमधल्या चीनविरोधी आंदोलनात भारताचा राष्ट्रध्वज झळकलागुरुवारी चीनच्या दडपशाहीविरोधात हाँगकाँगचे निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी एका युवकाच्या हातातला भारतीय राष्ट्रध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. हा राष्ट्रध्वज पाहून पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले. ‘भारत चीनशी लढतो आहे. त्यामुळे भारत हा आमचा मित्र ठरतो. मी भारतासोबत आहे’, असे उत्तर या युवकाने दिले. त्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. पण त्याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.

भारताने चीनला दणका दिल्यानंतर जगभरात आता भारताचा राष्ट्रध्वज चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधाचे प्रतीक म्हणून वापरण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी नोंदवली. भारताचे माजी लष्करप्रमुख वेद मलिक यांनीही त्याला दुजोरा देताना, भारताचा झेंडा विस्तारवादी राजवटीविरोधातील धैर्याचे प्रतीक ठरल्याचे सांगून हॉंगकॉंगमधील घटनेची नोंद घेतली.

हाँगकाँगमध्ये ४५ हजार भारतीय वास्तव्य करून आहेत. भारत व हाँगकाँगमध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळे हाँगकाँगवासियांसाठी भारत आता चीनविरोधात लढणारा आक्रमक देश बनला आहे. अमेरिका व ब्रिटनप्रमाणेच हाँगकाँगवासिय भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. मूळचे दक्षिण आशियाई युवक चीनविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याचे यानिमित्ताने समोर आलेले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून चीनच्या दडपशाहीविरोधात हाँगकाँगची जनता संघर्ष करते आहे. जून महिन्यात चीनच्या राजवटीने नवा कायदा करून हाँगकाँगवर ताबा मिळविल्यानंतरही हा लढा सुरू आहे. हजारो निर्दशक अजूनही चीनविरोधात रस्त्यावर उतरुन निर्दयी कम्युनिस्ट राजवटीविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. या आंदोलकांचा छळ करुन चीन हे आंदोलन मोडीत काढत आहे. गुरुवारी झालेल्या निदर्शनातही ६० जणांना अटक करण्यात आली. पण चीनविरोधातला हा लढा हाँगकाँग स्वतंत्र होईपर्यंत कायम राहणार असल्याचे हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी गट व नेत्यांनी बजावले आहे.

यापूर्वी कॅनडामध्ये तसेच अमेरिकेत झालेल्या चीनविरोधी निदर्शनात भारतीयांच्या बरोबरीने तैवानी तसेच तिबेटी वंशाचे नागरिकही सहभागी झाले होते. भारताचे तैवान व तिबेटबाबत घेतलेली आक्रमक भूमिका हे त्यामागील कारण ठरले आहे. जगभरात चीनविरोधात तयार होणारी आघाडी व त्यात भारताचे वाढते महत्त्व चीनला चांगलेच अस्वस्थ करणारे ठरू शकते.

leave a reply