पहिल्या तिमाहीत देशाचे ‘करंट अकाउंट सरप्लस’ १९.८ अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या ‘करंट अकाउंट सरप्लस’मध्ये १९.८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. हा सरप्लस देशाच्या सकल उत्पादन दराच्या (जीडीपी) ३.९ टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी ही माहिती दिली. कोरोनाव्हायरसच्या काळात व्यापारी तूट कमी झाली आहे. यामुळे देशाचे ‘करंट अकाउंट सरप्लस’मध्ये वाढ झाली आहे. यामुळे रुपया मजबूत होईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

'करंट अकाउंट सरप्लस'

लॉकडाऊनमुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निर्यातीच्या तुलनेत आयात घसरली आहे. याचा परिणाम देशाच्या ‘चालू वित्तीय खात्या’वर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.२०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या ‘करंट अकाउंट’मध्ये १५ अब्ज डॉलर्सची तूट नोंदविण्यात आली होती. ही जीडीपीच्या २.१ टक्के इतकी होती. या पार्श्वभूमीवर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहितील कामगिरी लक्ष वेधणारी ठरली आहे.

यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत देशात ६२.२ अब्ज डॉलर्सची आयात झाली. याच कालावधीत देशाची एकूण निर्यात ५२.३ अब्ज डॉलर्स इतकी नोदविण्यात आली होती. यामुळेच व्यापारी तूट १० अब्ज डॉलर्स इतकीच नोदविण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात आयात १२९.५ अब्ज डॉलर्स आणि निर्यात ८२.७ अब्ज डॉलर्स होती. यामुळे व्यापारी तूट ४६.८ अब्ज डॉलर्स इतकी होती.

पहिल्या तिमाहीत सेवा क्षेत्रातून ४६.८ अब्ज डॉलर्स मिळाले असून, २६.३ अब्ज डॉलर्स बाहेर गेले. यामुळे या क्षेत्रात सरप्लस सुमारे २० अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय इतर येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाच्या एकूण आकड्यानुसार देशाच्या चालू खात्यात सध्या १२२.४ अब्ज डॉलर्स जमा असून खर्च १०२.६ अब्ज डॉलर्स आहे. त्यामुळे ‘करंट अकाउंट सरप्लस’ १९.८अब्ज डॉलर्सवर गेला आहे. व्यापारी तूटीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चालू खात्याच्या सरप्लसमध्ये वाढ दिसून आली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे मार्चच्या अखेरीपासून कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे मागणीत मोठी घट झाल्याने आयात घसरली होती. त्याचवेळी वस्त्र, अभियांत्रिकी साहित्य, दागिन्यांची निर्यातही घटली आहे. शिवाय क्रूड ऑइल व इतर वस्तूंच्या किंमती घसरल्या असून त्यांची मागणीही कमी झाली आहे. यामुळे आयात कमी होत आहे. एप्रिल, मे महिन्याच्या तुलनेत देशातील निर्यात स्थिती जून महिन्यात सुधारल्याचे नव्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

leave a reply