चीनचे नेपाळच्या सात जिल्ह्यांमधील भूभागांवर अतिक्रमण

- नेपाळच्या विरोधी पक्षाचा दावा

काठमांडू/बीजिंग – चीनने नेपाळच्या सात जिल्ह्यातील भूभाग बळकावला आहे, असा आरोप नेपाळचा प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबतचे पुरावेही नेपाळ काँग्रेसचे नेते जीवन बहादूर शाही यांनी दिले आहेत. नुकतेच शाही यांच्या नेतृत्वाखाली एक पथकाने सीमाभागाची पाहणी केली होती. याआधी शनिवारी चीन सरकारी मुखपत्रात असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मधून नेपाळच्या जमिनीवर चीनच्या अतिक्रमणाचे दावे नाकारण्यात आले. तसेच भारतीय माध्यमे या सर्व प्रकरणाला वाढवून सांगत आहेत, असा आरोपही ‘ग्लोबल टाईम्स’मधून करण्यात आला. याशिवाय हा मुद्दा वारंवार उपस्थित करणारा नेपाळी काँग्रेस हा पक्ष भारत समर्थक असल्याचा शेरा ‘ग्लोबल टाईम्स’ने मारला आहे.अतिक्रमण

भारताने आपल्या भूमीवर कब्जा केल्याचा आरोप लावून नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध करणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारवर विरोधीपक्षाकडून हल्ले तीव्र झाले आहेत. भारतावर आरोप लावणारे नेपाळ सरकार चीनने बळकावलेल्या जमिनीवर गप्प का असे प्रश्न विचारले जात आहेत. नेपाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला नेपाळी काँग्रेसने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

नेपाळी कॉग्रेसचे नेते जीवन बहादूर शाही यांनी चीनने नेपाळच्या जमिनीवर केलेल्या कब्जाचे पुरावे नेपाळी माध्यमांपुढे ठेवले. नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या जमिनीवर केलेला बांधकामाचा मुद्दा गाजत आहेत. मात्र चीनने केवळ हुमलामधीलच नाही, तर नेपाळच्या सात जिल्ह्यातील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा शाही यांनी केला. नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारने चीन समोर शरणागती पत्करल्याचे शाही म्हणाले.

चीन हुमलामध्ये बळकावलेल्या जमिनीवर वेगाने बांधकामे करीत आहे. ही बांधकामे बॉर्डर पिलर १२ च्या आत नेपाळी क्षेत्रात झाली आहेत. इतकेच नाही लापचा जिल्ह्यातही नेपाळच्या मोठ्या भूभागावर चीनने अतिक्रमण केले आहे. चीनने नेपाळशी चर्चा केल्याशिवाय सीमेवर पिलर गाडले आहेत. नवा बॉर्डर पिलर टाकताना दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने निर्णय घेतला जातो. मात्र चीनने तसे केले नाही. सीमा भागातील नेपाळी नागरिकांना चीनच्या अतिक्रमणामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांना त्यांच्या जमिनीवर जाऊ दिले जात नसल्याचे शाही यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ग्लोबल टाईम्सने लेखात चीनने बळकावलेल्या जमिनीचा मुद्दा लावून धरणाऱ्या नेपाळी काँग्रेसला भारत समर्थक म्हटले आहे. सीमेजवळ जी बांधकामे झाली आहेत ती चीनच्या तिबेट क्षेत्रात बुरंग काऊंटीमध्ये झाली आहेत. येथे नवीन गाव वसविण्यात आले आहे. हे काम सुरु करण्यापूर्वी मे महिन्यात लष्करी, तसेच व्यवसायिक सर्वेक्षक आणि मॅपिंग कारण्याऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच ही बांधकामे सुरु असताना नेपाळी सैनिकांबरोबर कोणतीही झटपट झाली नसल्याचा दाखला ग्लोबल टाईम्सने दिला आहे. त्याचवेळी नेपाळचे सर्वेक्षण करणारे कर्मचारी व्यवसायिक नाहीत, त्यामुळे सीमा निश्चित करताना चुका होत आहेत, असा दावाही ग्लोबल टाईम्सने केला आहे.

leave a reply