अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष पेटला

- सात जवान व तालिबानच्या कमांडरसह १८ जण ठार

१८ जण ठारकाबूल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानमध्ये तालिबानबरोबर झालेला संघर्ष आणि बॉम्बस्फोटात अफगाणी सुरक्षादलाच्या सात जवानांसह १९ जणांचा बळी गेला. तर बल्ख आणि कुंदुझ प्रांतात अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत तालिबानच्या कमांडरसह १८ जण ठार झाले.

शनिवारी रात्री तालिबानच्या दहशतवाद्यांनी कुंदुझमधील इमाम साहिब जिल्ह्यात अफगाणी सुरक्षा चौक्यांवर हल्ले चढविले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये भडकलेल्या संघर्षात सात जवान ठार झाले. तसेच या हल्ल्यात सात तालिबानी ठार झाले. या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच बल्ख प्रांतात अफगाणी सुरक्षादलांनी ११ तालिबानींना ठार केले. यात तालिबानचा कमांडर मुल्लाह शाकुर ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानी लष्कराने दिली.

१८ जण ठारयाशिवाय अफगाणिस्तानाच्या घोरमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण कार बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाले. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घोरच्या सुरक्षा दल आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करुन हा शक्तिशाली स्फोट घडविण्यात आला. या स्फोटाने आजूबाजूंच्या इमारतींचे नुकसान झाले. स्फोटाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढवून कतारच्या दोहामध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतीकराराचे उल्लंघन केल्याचे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकनलष्कराने तालिबानचा हा आरोप फेटाळून लावला. तालिबानच्या हल्ल्यांपासून अफगाणिस्तानच्या सुरक्षादलाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने हे हवाई हल्ले चढविल्याचे अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याचे प्रवक्ते कर्नल सनी लेगट्ट यांनी म्हटले आहे.

leave a reply