इराण आखातात अस्थैर्य आणि विध्वंस माजवित आहे

- सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

मॉस्को – आखातातील इराक, सिरिया, येमेन या देशांमध्ये निर्माण झालेल्या अस्थैर्याला इराण जबाबदार आहे. इराण आपल्या कारवायांनी आखातात अस्थैर्य आणि विध्वंस माजवित असल्याचा आरोप सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी केला. रशियाच्या दौर्‍यावर असताना सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणवर हा हल्ला चढविला आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी दोन दिवसांपूर्वी रशियाचा दौरा केला. या दौर्‍यात प्रिन्स फैझल यांनी रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली. आखातातील घडामोडी यावर रशिया व सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचे उभय देशांच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले.

सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांबरोबर माध्यमांशी बोलताना आखातातील अस्थैर्यासाठी इराण जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. इराणची राजवट आखाती देशांमध्ये करीत असलेल्या हस्तक्षेपावर प्रिन्स फैझल यांनी टीका केली. त्याचबरोबर या क्षेत्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी इराणचा हस्तक्षेप रोखणे आवश्यक असल्याचे सौदीचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. इराणसंलग्न दहशतवादी संघटना सिरिया, येमेनमधील अस्थैर्यात भर टाकत असल्याचा आरोप प्रिन्स फैझल यांनी केला. ‘सौदीबरोबरच आखाती देशात विकास व स्थैर्य प्रस्थापित करणे हे सौदीचे ध्येय आहे. मात्र यासाठी आखाती देशांची सुरक्षा व स्थैर्याच्या मार्गातील अडथळ्याविरोधात एकत्रित काम करणे गरजेचे आहे’, असे प्रिन्स फैझल यांनी स्पष्ट केले.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी देखील इराणबाबत सौदीला वाटत असलेली चिंता रशिया समजून घेऊ शकतो, असे स्पष्ट केले. रशियाला देखील आखातात स्थैर्य हवे आहे. यासाठी इराण व आखाती देशांमध्ये चर्चा होणेे, परस्परांविषयी विश्‍वास प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी म्हटले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सौदीमध्ये ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’ (जीसीसी) या आखाती देशांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सौदीने गेल्या तीन वर्षांपासून कतारवर टाकलेले निर्बंध मागे घेऊन नव्याने सहकार्य प्रस्थापित केले होते. त्याचबरोबर इराणच्या विरोधात आखातातील सर्व देशांनी एकजूट करावी, असे आवाहन सौदी अरेबियाकडून करण्यात आले होते.

leave a reply