बगदाद/वॉशिंग्टन – इराकची राजधानी बगदादमधील अतिसंरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या ‘ग्रीन झोन’ भागात सोमवारी दोन रॉकेट हल्ले झाले. अमेरिकी दूतावासाजवळ हे रॉकेट कोसळल्यामुळे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सदर दूतावासाला लक्ष्य केल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्याभरात इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधावर झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला ठरतो. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना यासाठी जबाबदार असल्याचे बोलले जाते. पण अमेरिकेने या हल्ल्यांसाठी इराणला दोषी धरण्याचे टाळले आहे.
इराकी संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ग्रीन झोनमध्ये दोन रॉकेट कोसळले. निर्मनुष्य भागात हे रॉकेट कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही. पण येथील मोटारींचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. तसेच या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी शनिवारी ‘बलाद’ हवाईतळावर चार रॉकेट हल्ले झाले होते. यामध्ये अमेरिकेच्या सुरक्षा कंपनीचा अधिकारी जखमी झाला होता. तर गेल्या आठवड्यात इरबिल येथील अमेरिकेच्या तळावर?झालेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले होते.
यापैकी इरबिलमधील पहिल्या हल्ल्याची जबाबदारी इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. पण गेल्या तीन दिवसात झालेल्या दोन हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. सोमवारच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी कत्युशा रॉकेट्सचा वापर केला होता. या रॉकेट्सचा वापर इराणसंलग्न हिजबुल्लाह, कतैब या दहशतवादी संघटनांकडून केला जातो. त्यामुळे या हल्ल्यांमागे इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचे नक्की मानले जाते.
पण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने या रॉकेट हल्ल्यांसाठी इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर थेट आरोप करण्याचे टाळले आहे. या हल्ल्यांसाठी नेमके कोण जबाबदार आहे, याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेली नाही. त्यामुळे त्याआधी इराणला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी म्हटले आहे. तर हल्ल्यांसाठी थेट इराणला जबाबदार धरले तर सूडाने भडकलेल्या संघटना आणखी हल्ले चढवू शकतात, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिली.