महाराष्ट्र व केरळात कोरोनाचे नवे ‘स्ट्रेन्स’ आढळले

-केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी माहिती दिली आहे. देशात महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणात कोरोनाव्हायरसचे दोन नवे ‘स्ट्रेन्स’(प्रकार) सापडले आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी हे प्रकार जबाबदार नाहीत, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच देशात कोरोना विषाणूमध्ये आणखी काही बदल झाले आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे. यासाठी विविध राज्यातून नमुने गोळा करण्यात येत असून त्यांची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ केली जात असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

दोनच दिवसांपूर्वी ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संक्रमण पसरविणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर, देशात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन सापडल्याचा आरोग्य मंत्रालयाने केलेला खुलासा महत्त्वाचा ठरतो. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणात कोरोनाव्हायरसचे दोन नवे प्रकार आढळले आहेत. ‘ए४४०के’ आणि ‘ई४८४के’, अशी या कोरोनाच्या नव्या प्रकारांची नावे आहेत. मात्र ते घातक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधीही देशात कोरोनाच्या विषाणूत बदल होत नवे प्रकार आढळले होते. मात्र तेही घातक सिद्ध झालेले नाहीत. संशोधनात ‘ए४४०के’ आणि ‘ई४८४के’ या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे संशोधनात आढळलेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मात्र देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातच कोरोनाचे ७५ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. सध्या देशात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्ण केरळमधील आहेत, ३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तसेच ४ टक्के रुग्ण कर्नाटकातील, तर २.५ टक्के रुग्ण तमिळनाडूतील आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

leave a reply