चीनकडून लॅटिन अमेरिकेतील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक प्रयत्न

बीजिंग – चीनकडून लॅटिन अमेरिकेत प्रचंड गुंतवणूक करण्यात येत असून हाच कल कायम राहिला तर अमेरिकेला कोणत्याही संघर्षाशिवाय लॅटिन अमेरिका गमवावा लागेल, असे अधिकारी व विश्‍लेषकांकडून बजावण्यात येत आहे. ‘द डायलॉग’ या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या ‘चायना-लॅटिन अमेरिका फायनान्स डेटाबेस’नुसार, चीनने गेल्या दोन दशकात लॅटिन अमेरिका व कॅरिबिअन देशांमध्ये सुमारे १५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीन व लॅटिन अमेरिकेतील व्यापारही गेल्या दोन दशकांमध्ये २५ पटींहून अधिक वाढल्याचेही समोर आले आहे.

चीनकडून लॅटिन अमेरिकेतील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक प्रयत्नअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मंगळवारपासून लॅटिन अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर, लॅटिन अमेरिकेतील चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने ‘जी७’ गटासह ‘बिल्ट बॅक बेटर वर्ल्ड’(बी३डब्ल्यू) उपक्रमाची घोषणा केली होती. हा उपक्रम चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला आव्हान देणारा म्हणून ओळखण्यात येतो. ‘बी३डब्ल्यू’च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमेरिकेने आपले प्रतिनिधी गेल्या महिन्यात लॅटिन अमेरिकेत पाठविले होते. त्यापाठोपाठ आता परराष्ट्रमंत्री ब्लिंकनही लॅटिन अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत.

मात्र अमेरिकी अधिकार्‍यांचे हे दौरे चीनचा वाढता प्रभाव डळमळीत करण्यासाठी फारसे उपयुक्त ठरतील, असे वाटत नाही, असा दावा विश्‍लेषक व अधिकार्‍यांकडून करण्यात येतो. विश्‍लेषक निकोलस सॅन्तो यांनी, अमेरिकेने गेल्या दशकभरात लॅटिन अमेरिकेकडे फारसे व योग्य लक्ष पुरविले नसल्याचा उघड आरोप केला आहे. अमेरिकेच्या या दुर्लक्षामुळे व्यापारी करारांसह इतर सर्व मार्गाने चीन आपला प्रभाव वाढवित चालला आहे, असेही सॅन्तो यांनी बजावले. इक्वेडोरच्या अमेरिकेतील राजदूत इव्होन बेकी यांनी, लॅटिन अमेरिकेसाठी सुरू असलेली स्पर्धा अमेरिका कोणताही संघर्ष न करता चीनला भेट देत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे माजी वरिष्ठ अधिकारी थॉमस शॅनोन यांनी, चीनकडून लॅटिन अमेरिका व कॅरिबियनमध्ये सुरू असलेल्या हालचाली या अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला. ‘अमेरिका चीनचे अंगण असणार्‍या तैवान व नजिकच्या क्षेत्रातील लष्करी हालचाली वाढवित आहे. तुम्ही जर आमच्या शेजारी येऊन कारवाया करणार असाल, तर आम्हीही तुमच्या शेजारी येऊन प्रत्युत्तर देऊ शकतो, हे दाखविण्याचा चीनचा प्रयत्न आहे’, असे शॅनोन यांनी सांगितले.चीनकडून लॅटिन अमेरिकेतील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक प्रयत्न

‘चायना-लॅटिन अमेरिका फायनान्स डेटाबेस’नुसार, चीन व लॅटिन अमेरिकेतील व्यापार सध्या ३०० अब्ज डॉलर्सच्या वर गेला आहे. चीन या खंडातून मोठ्या प्रमाणात इंधन व खनिजे आयात करीत आहे. त्याचवेळी अर्थसहाय्य व पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या जोरावर या देशांमधील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकट्या व्हेनेझुएलाला चीनने ६० अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज दिले आहे. व्हेनेझुएलासह पॅराग्वे व इक्वेडोर या देशांना दिलेले कर्ज त्यांच्या जीडीपीच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. चिलीसारख्या देशातील दोन ‘एनर्जी नेटवर्क्स’ चीनने ताब्यात घेतली आहेत. अर्जेटिनामध्ये चीनकडून तीन मोठे ऊर्जाप्रकल्प उभारण्यात येत आहेत. तर ब्राझिलमधील दुसर्‍या क्रमांकाच्या बंदरात चीनने मालकी हिस्सा मिळविला आहे.

यासह विविध देशांमध्ये सुरू असणार्‍या इतर प्रकल्पांच्या माध्यमातून चीन लॅटिन अमेरिकेतील प्रभाव वाढवित चालला आहे. अमेरिका आता इतर देशांना बरोबर घेऊन त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत असली तरी गमावलेला प्रभाव परत मिळविणे अमेरिकेसाठी मोठे आव्हान ठरेल, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply