भारताकडून अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर विमानभेदी तोफांची तैनाती

तवांग – शत्रूच्या विमानांना लक्ष्य करणार्‍या ‘एल७०’ तोफा अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर तैनात करून भारताने चीनला प्रत्युत्तर दिले आहे. याआधीच भारतीय सैन्याने एलएसीवर ‘एम-७७७’ हॉवित्झर तसेच बोफोर्स तोफांची तैनाती केली होती. नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर हेरॉन ड्रोन्स तसेच ‘एएलएच धु्रव’ हेलिकॉप्टर्स तैनात केल्याच्या बातम्या आल्या होत्या. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळ चीन मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली करीत असताना, भारतीय सैन्याने त्याला प्रत्युत्तर देणारी तैनाती केल्याचे यामुळे समोर येत आहे.

भारताकडून अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर विमानभेदी तोफांची तैनातीअरुणाचप्रदेशच्या एलएसीवरही भारतीय सैन्य चीनच्या लष्करी हालचालींकडे अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे इर्स्टन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर भारतीय सैन्याने या क्षेत्रात कुठल्याही आकस्मिक आव्हानाचा सामना करण्याची पूर्ण सज्जता ठेवलेली आहे, याची जाणीवही लेफ्टनंट जनरल पांडे यांनी करून दिली. माध्यमांना त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर, विमानभेदी तोफांच्या तैनातीची माहिती समोर येत आहे. यानुसार ‘एल७०’ या लढऊ विमाने भेदू शकणार्‍या तोफांची तैनाती अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर करण्यात आली असून यामुळे सैन्याच्या क्षमतेत अधिकच वाढ होईल, असा दावा केला जातो.

शत्रूची मानवरहित विमाने, हल्ला चढविणारी हेलिकॉर्प्स आणि प्रगत लढाऊ विमाने देखील ‘एल७०’ तोफांद्वारे भेदता येऊ शकतात. या तोफांमध्ये लक्ष्य टिपण्याची स्वयंचलित व्यवस्था असून यासाठी सदर तोफांवर इस्रायली रडारयंत्रणा बसविण्यात आलेली आहे. याचा फार मोठा लाभ भारतीय सैन्याला मिळणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, चीन अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळील क्षेत्रात गाव वसविण्याची तयारी करीत असल्याचा दावा लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी केला होता. याचा वापर करून चीन इथल्या एलएसीवरील वर्चस्व गाजविण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र याच्या विरोधात भारतीय सैन्याने आवश्यक त्या हालचाली सुरू आहेत. चीनने इथल्या एलएसीजवळील भागात उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या तोडीस तोड सुविधा भारतानेही उभे केल्या असून या आघाडीवर चिंतेचे कारण नसल्याचा निर्वाळा लेफ्टनंट जनरल पांडे यांनी दिला होता.

उत्तराखंड तसेच अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील एलएसीवर चीनच्या लष्कराने घुसखोरीचे प्रयत्न करून पाहिले होते. पण भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानांना वेळीच रोखले आणि इथे कुरघोडी करण्याची संधीच चीनच्या जवानांना मिळू दिली नाही. पुढच्या काळातही चीनकडून अशा कुरापती काढल्या जाण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. चीनच्या या कारवायांचा द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव भारताचे नेते चीनला सातत्याने करून देत आहेत. तरीही एलएसीवर तणाव कायम ठेवण्यातच आपले हितसंबंध गुंतलेले आहेत, असा समज चीनने करून घेतलेला आहे.

leave a reply