जेरूसलेम – ‘काही तासांपूर्वी इराणने इराकमधील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या परिसरात क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. पण यानंतरही इराणसोबत चुकीचा अणुकरार करण्यासाठी अमेरिकेची सुरू असलेली ढिसाळघाई फक्त बिनडोकपणाचे लक्षण ठरत नाही तर ते अत्यंत धोकादायक देखील आहे’, असा इशारा इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. बायडेन प्रशासन करीत असलेल्या प्रस्तावित अणुकरारामुळे पुढील तीन वर्षात इराण अण्वस्त्रसज्ज देश बनेल, असा दावा इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनी केला.
रविवारी इराकच्या उत्तरेकडील कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलवर जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले झाले. येथील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या परिसराला लक्ष्य करून हे हल्ले चढविण्यात आले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आपल्या संकेतस्थळावरुन या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. इरबिलमधील इस्रायलच्या छुप्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केला. तसेच इस्रायलने इराणच्या हितसंबंधांना लक्ष्य केले तर यापुढे याहून भीषण हल्ले चढविले जातील, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्ड्सनी दिली होती.
या हल्ल्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे चार अधिकारी ठार झाल्याचा दावा लेबेनॉनस्थित अरबी वृत्तसंस्थेने केला. यामध्ये मोसादच्या महिला एजंटचा समावेश असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या दाव्याला इराण किंवा इस्रायलने दुजोरा दिलेला नाही. पण इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये इराणने इरबिलमध्ये चढविलेल्या हल्ल्यांवर टीका केली. अमेरिका व इतर युरोपिय देश अणुकरारासाठी प्रयत्न करीत असताना इराण आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करीत असल्याचे नेत्यान्याहू यांनी लक्षात आणून दिले.
बायडेन प्रशासन इराणबरोबर करीत असलेला अणुकरार २०१५ सालच्या अणुकरारापेक्षाही धोकादायक असल्याचा दावा इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनी केला. ‘नव्या अणुकरारामुळे इराणला निर्बंधातून मुक्त केले जाईल आणि वर शेकडो अब्ज डॉलर्स पुरविले जातील. या निधीतून इराण आखातात तसेच जगभरात नव्याने दहशतवाद पसरविल. म्हणूनच नवा अणुकरार इराणच्या अणुकार्यक्रमाला अधिक बळ देणारा ठरेल. यामुळे डझनावरी अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी इराणला पुरेसे संवर्धित युरेनियम मिळेल व अमेरिकेच्या कुठल्याही भागापर्यंत पोहोचू शकणारी इराणची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे या आण्विक स्फोटकांनी सज्ज होतील’, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला.
अमेरिका, युुरोपिय देश आणि इराण यांच्यातील अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा केला जातो. बायडेन प्रशासन या अणुकरारासाठी उत्सूक असले तरी इराण यासाठी नव्या अटी ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. अणुकराराला विलंब होत असल्यामुळे ब्रिटन व फ्रान्स इराणला संधीची खिडकी बंद होत असल्याचे इशारे देत आहेत. पण बायडेन प्रशासनाने इराणसोबत अणुकरार करू नये, अशी ठाम भूमिका इस्रायल व अरब देशांनी स्वीकारली आहे. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी देखील अणुकराराच्या विरोधात असून बायडेन प्रशासन या करारासाठी इस्रायल तसेच आपल्या अरब मित्रदेश गमावित असल्याचा इशारा देत आहेत.