चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उद्रेकाचा हाहाकार

- २४ तासांमध्ये पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले

हाहाकारबीजिंग – चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उद्रेकाने हाहाकार उडविला असून गेल्या २४ तासांमध्ये पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसर्‍या दिवशी पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने चीनच्या यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून निर्बंध अधिक कठोर करण्याचे संकेत दिले जात आहेत. सर्वाधिक फटका जिलिन प्रांताला बसला असून पूर्ण प्रांतात ‘झीरो कोविड लॉकडाऊन’चे आदेश देण्यात आले आहेत. जिलिन प्रांताव्यतिरिक्त ग्वांगडॉंग प्रांत तसेच शांघाय व शेन्झेन या मोठ्या शहरांमध्ये ‘पार्शिअल लॉकडाऊन’ लागू झाले आहेत. चीनमधील या उद्रेकाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती असून आघाडीच्या पाश्‍चात्य कंपन्यांनी आपले कारखाने बंद ठेवल्याचे सांगण्यात येते.

हाहाकार२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली होती. मात्र त्यावेळी चीनने आपल्याकडील रुग्णांचे तसेच दगावणार्‍यांची योग्य आकडेवारी प्रसिद्ध केली नव्हती. कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढल्याने चीनने आपल्याकडील रुग्णांची माहिती देण्यास सुरुवात केली होती. त्यातही चीनने मोठ्या प्रमाणावर लपवाछपवी केल्याचे उघड झाले होते. साथ फैलावल्यानंतर चीनने ‘झीरो कोविड पॉलिसी’ लागू करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. वर्षभरानंतर रुग्णसंख्या घटल्यानंतर हे धोरण यशस्वी ठरल्याचे सांगून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपलीच पाठ थोपटून घेतली होती.

मात्र गेल्या काही महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची ‘झीरो कोविड पॉलिसी’ फसल्याचे वारंवार समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजधानी बीजिंगसह देशाच्या विविध भागांमध्ये सातत्याने कोरोनाचे उद्रेक समोर आले होते. या उद्रेकांचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेलाही बसला होता. मात्र तरीही चीनची कम्युनिस्ट राजवट कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचे दावे करीत आहे. नव्या उद्रेकाने कम्युनिस्ट राजवटीच्या या दाव्यांना सपशेल खोटे पाडल्याचे दिसत आहे.

हाहाकारफेब्रुवारी महिन्यापासून चीनमधील रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. आरंभीच्या काळात तीन-चार प्रांतांपुरत्या मर्यादित राहिलेल्या रुग्णांची व्याप्ती आता २८ प्रांतांपर्यंत पसरली आहे. या वाढत्या संसर्गामागे कोरोनाचा ‘स्टेल्थ ओमिक्रॉन व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका सव्वादोन कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिलिन प्रांताला बसला आहे. या प्रांतात मंगळवारी तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून पूर्ण प्रांतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिलिनपाठोपाठ ग्वांगडॉंग, शान्डॉंग, जिआंग्सु, गान्सु या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. या प्रांतांसह देशाच्या इतर भागांमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

चीनमधील नवा उद्रेक व त्यासाठी लादलेल्या निर्बंधांचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याचे संकेत मिळत आहेत. चीनमधील ‘फोक्सवॅगन’, ‘फॉक्सकॉन’, ‘ऍमेझॉन’ यासारख्या कंपन्यांचे अनेक कारखाने व संबंधित उपक्रम बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी निर्बंधांमुळे चीनमधील उत्पादनांची मागणी घसरण्यास सुरुवात झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीत आधीच घट झाली असून त्यात चीनची पडलेली भर बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोरील अडचणी वाढविणारी ठरते. याचे परिणाम शेअरबाजारातही दिसून आले आहेत. मंगळवारी आशियासह ऑस्ट्रेलियातील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

leave a reply