अमेरिकेने आपल्या जैविक प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय निरिक्षकांसाठी खुल्या कराव्या

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची मागणी

जैविक प्रयोगशाळाबीजिंग – ‘आपल्या जैविक प्रयोगशाळांची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी जगभरातील आपल्या जैविक प्रयोगशाळा अमेरिका आंतरराष्ट्रीय निरिक्षकांच्या स्वतंत्र चौकशीसाठी का खुल्या करीत नाही? असा सवाल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तसेच युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांबाबत अमेरिकेने दिलेले तपशील विसंगत आणि गोंधळ निर्माण करणारे असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनच्या निधीवर चालणार्‍या युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळा रशियासह संपूर्ण युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा रशियाने दिला आहे.

गेल्या आठवड्यात रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती जगासमोर प्रसिद्ध केली. अमेरिका या प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलरा व इतर भयानक विषाणूंवर संशोधन करीत असल्याचा आरोप रशियाने केला होता. २४ फेब्रुवारी रोजी रशियन लष्कर युक्रेनमध्ये घुसल्यानंतर अमेरिकेने या प्रयोगशाळांची आवराआवर करून येथील कागदपत्रे व पुराव्यांची जाळपोळ सुरू केली होती. तरीही याचे काही पुरावे आपल्या हाती सापडल्याचा दावा रशियाने केला.

यानंतर बायडेन प्रशासनाला सिनेटच्या चौकशी समिती तसेच माध्यमांसमोर या आरोपांवर खुलासा द्यावा लागला होता. युक्रेनमधील प्रयोगशाळांना पेंटॅगॉनने पैसा पुरविल्याची कबुली बायडेन प्रशासनाने दिली. तसेच या प्रयोगशाळांमधील संशोधन रशियन लष्कराच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी जाळपोळ केल्याचे अमेरिकेने मान्य केले. पण येथे कुठल्याही प्रकारे जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती सुरू नव्हती, असा दावा बायडेन प्रशासनाने केला. त्यानंतर रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता.

जैविक प्रयोगशाळारशियाने अमेरिकेवर केलेल्या या आरोपांना चीनने देखील समर्थन दिले. तसेच युक्रेनसह जगभरात अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळा सुरू असल्याचा ठपका चीनने ठेवला होता. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिकेने आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी या जैविक प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय निरिक्षकांसाठी खुल्या कराव्या, अशी मागणी केली. युक्रेनमधील या प्रयोगशाळांबाबत अमेरिका कोणती माहिती लपवित आहे? युक्रेनला तरी आपल्या देशातील या प्रयोगशाळांमध्ये काय सुरू आहे, याची कल्पना होती का? असे प्रश्‍न लिजिआन यांनी उपस्थित केले.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी ऍलेक्सी पॉलिशूक यांनी रशियन वृत्तवाहिनीशी बोलताना युक्रेनमधील या प्रयोगशाळांबाबत गंभीर इशारा दिला. पेंटॅगॉनने पैसा पुरविलेल्या या प्रयोगशाळा रशियाच नाही तर संपूर्ण युरोपच्या सुरक्षेसाठी देखील धोकादायक ठरतात, असे पॉलिशूक यांनी बजावले.

दरम्यान, रशिया व चीनबरोबरच अमेरिकेतील काही लोकप्रतिनिधी व माध्यमे देखील जगभरातील अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळांवर चिंता व्यक्त करीत आहेत.

leave a reply