अमेरिकेला मजबूत नेतृत्त्वाची गरज आहे

-‘जेपी मॉर्गन’चे प्रमुख जेमी डिमॉन यांचे बायडेन प्रशासनावर टीकास्त्र

जेमी डिमॉनवॉशिंग्टन – ‘युक्रेन युद्धाच्या आधीपासून अमेरिकेसमोर अनेक गंभीर व मोठी आव्हाने खडी ठाकली आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेला निर्णायक आणि मजबूत नेतृत्त्वाची आवश्यकता आहे’, अशा शब्दात ‘जेपी मॉर्गन’ या आघाडीच्या वित्तसंस्थेचे प्रमुख जेमी डिमॉन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना लक्ष्य केले. अमेरिकेचे नेतृत्त्व मजबूत नसेल तर अराजक माजेल, असा इशाराही डिमॉन यांनी दिला. बायडेन प्रशासनाची धोरणे अनाकलनीय व कोणताही समन्वय नसणारी असून जाचक नियम व नियंत्रणामुळे अमेरिकेच्या पायाभूत क्षेत्राच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.

अमेरिकेतील आघाडीची बँक म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘जेपी मॉर्गन’चे प्रमुख जेमी डिमॉन यांनी गुंतवणूकदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात बायडेन प्रशासनाला धारेवर धरले. युक्रेन युद्धापूर्वीही अमेरिकेसह जगासमोर अनेक आव्हाने खडी ठाकली होती, याची जाणीव डिमॉन यांनी पत्रातून करून दिली. ‘या आव्हानांवर मात करण्यासाठी अमेरिकेचे नेतृत्त्व मजबूत असण्याची गरज आहे. ही बाब जगासह अमेरिकेसाठीसुद्धा महत्त्वाची ठरते’, अशा शब्दात डिमॉन यांनी अप्रत्यक्षरित्या सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे नेतृत्त्व कमकुवत आहे, हे लक्षात आणून दिले.

‘युक्रेनच्या युद्धाने गुंतागुंतीच्या जगात राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व असते, ही बाब अधोरेखित केली आहे. शांततेच्या काळातही ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते, हे आपण विसरता कामा नये. सुरक्षेबाबत गैरसमजही बाळगले जाऊ नयेत. सत्तेला पोकळीचा तिटकारा असतो, हे लक्षात ठेवा. अमेरिकेचे नेतृत्व जर मजबूत नसेल तर अराजक माजू शकते’, असे डिमॉन यांनी बजावले. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनाच्या आर्थिक धोरणांनाही लक्ष्य केले.

‘सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाने सरकारी निधीच्या वापराबाबत रिपब्लिकन पक्षाला वाटत असलेल्या चिंतांची दखल घ्यायला हवी. प्रशासनाच्या निधीचा वापर मोठ्या व वाया जाणार्‍या योजनांसाठी होत असेल तर त्याने समाजातील छोट्या घटकांना काहीच फायदा होणार नाही. आपल्याला चांगले सरकार हवे असले तरी केवळ हीच बाब सर्व समस्यांवरील उत्तर नाही याची जाणीव डेमोक्रॅटस्ना असायला हवी’, अशा शब्दात डिमॉन यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. युक्रेन युद्धामुळे पुढील काळात महागाई अधिकच वाढणार असल्याचा इशारा देताना सध्या बायडेन प्रशासनाकडून आर्थिक समस्यांसाठी राबविण्यात येणारी धोरणे अनाकलनीय व कोणताही समन्वय नसणारी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

leave a reply