इस्रायलने १५ हून अधिक दहशतवादी हल्ले उधळले

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

दहशतवादी हल्ले उधळलेजेरूसलेम – ‘गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायली जनतेने अनुभवलेले दहशतवादी हल्ले म्हणजे इशाराघंटा ठरते’, असे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी बजावले आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी १५हून अधिक दहशतवादी हल्ले उधळले आहेत, याकडे लक्ष वेधून आता जुन्या चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे, असा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायली जनतेला दिला.

इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी मंगळवारी वेस्ट बँकचा दौरा केला. गेल्या आठवड्यात इस्रायल तसेच वेस्ट बँक येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ इस्रायलींचा बळी गेला. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान बेनेट यांनी वेस्ट बँकमधील सुरक्षा चौकीला भेट दिली.

गेल्या दहा दिवसांमध्ये इस्रायलच्या बिरशेबा, हादेरा आणि बेनी ब्राक येथे झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाल्या असून त्यांनी १५ हून अधिक दहशतवादी हल्ले यशस्वीरित्या उधळल्याची माहिती पंतप्रधान बेनेट यांनी केली.

दहशतवादी हल्ले उधळलेहे दहशतवादी इस्रायल तसेच वेस्ट बँकमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, असे इस्रायली पंतप्रधानांनी स्पष्ट केले.याप्रकरणी ४०० हून अधिक जण ‘आयएस’ किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी आत्तापर्यंत २०० संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी किमान २० जण दहशतवादी हल्ल्याची क्षमता राखून होते, असे इस्रायली दैनिकाचे म्हणणे आहे. इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी ‘ऑपरेशन ब्रेकवॉटर’ छेडण्यात आले असून संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची तयारी किंवा योजना आखणार्‍यांवर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी त्यावर कारवाई सुरू केली आहे.

अमेरिका, फ्रान्समध्ये ज्यूधर्मियांवरील हल्ले वाढले

न्यूयॉर्क/पॅरिस – अमेरिका आणि फ्रान्समधील ज्यूधर्मियांवरील विद्वेषी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ज्यूधर्मियांवरील हल्ले वाढल्याची कबुली गव्हर्नर कॅथी होशूल यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात न्यूयॉर्क शहरातच ज्यूधर्मियांवरील हल्ल्याच्या तब्बल ५६ घटना समोर आल्या होत्या.

गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन शहरात सहा हल्लेखोरांनी ज्यूधर्मियाला मारहाण केली होती. याप्रकरणी एकाला अटक झाली असून अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. ‘अँटी डिफेमेशन लीग-एडीएल’ने या घटनेची नोंद घेऊन हल्लेखोरांची माहिती देणार्‍याला १० हजार डॉलरचे ईनाम जाहीर केले. न्यूयॉर्कमधील ज्यूधर्मिय आपल्यावरील वाढत्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त करीत असून हे शहर आपल्यासाठी सुरक्षित राहिलेले नसल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही आठवड्यांपूर्वी एका ज्यूधर्मिय नागरिकाचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघात नसून ज्यूद्वेषातून जमावाने ही हत्या घडविल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे फ्रान्समधील ज्यूधर्मियांवरील वाढते हल्ले देखील चिंतेचा विषय बनला आहे. फ्रान्सच्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

leave a reply