इराणचे इंधन उत्पादन निर्बंधांपूर्वीच्या स्तरावर पोहोचले

इंधन उत्पादनतेहरान – इराणने इंधनाचे उत्पादन वाढविले असून आपली इंधनाची निर्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढल्याची माहिती इराणने दिली आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना, आखाती देशांनी इंधनाचे उत्पादन वाढवावे आणि इंधनाचे दर नियंत्रित ठेवावे, असे आवाहन अमेरिका करीत आहे. पण ओपेकचे सदस्य असलेल्या देशांनी अमेरिकेची ही मागणी अमान्य केली. अशा परिस्थितीत इराणने आपल्या इंधनाचे उत्पादन व निर्यात वाढविण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या आघाडीवर इराण अमेरिकेने २०१८ साली निर्बंध लादण्याआधीच्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे.

इराणचे इंधनमंत्री जवाद ओवजी आणि इराणच्या ‘नॅशनल इरानियन ऑईल कंपनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहसेन खोजास्तेमेहर यांनी इराणच्या इंधन उत्पादन व निर्यातीत झालेली वाढ जाहीर केली. सध्या इराण प्रतिदिन ३८ लाख बॅरेल्स इंधनाचे उत्पादन करीत आहे. ही क्षमता चार वर्षांपूर्वीच्या अर्थात अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादण्यापूर्वीच्या काळातील असल्याचे ओवजी यांनी स्पष्ट केले.

पण इराणच्या इंधन उत्पादनातील ही वाढ इथपर्यंत थांबणार नसून येत्या वर्षात इंधन उत्पादन तसेच निर्यात, इंधनवायू व इतर संबंधित वस्तूंचे उत्पादन वाढेल, असा दावा ओवजी यांनी केला. यासाठी इराण नवे ग्राहक, बाजारपेठा मिळवित असल्याची माहिती ओवजी यांनी दिली. गेल्या आठ महिन्यात इराणच्या इंधनवायूची निर्यात चार पटीने वाढल्याची घोषणा आठवड्यापूर्वीच ओवजी यांनी केली होती. यानंतर इराणच्या ‘नॅशनल इरानियन ऑईल कंपनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहसेन खोजास्तेमेहर यांनी इंधननिर्यातीबाबत महत्त्वाची माहिती दिली. इराणची इंधननिर्यात देखील ४० टक्क्यांनी वाढून निर्बंधांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याचे म्हटले आहे. सर्वात कठीण काळात इराणच्या या इंधननिर्यातीत वाढ झाल्याचे खोजास्तेमेहर यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे निर्बंध असतानाही इराणच्या इंधननिर्यातीत फरक पडला नसल्याचे खोजास्तेमेहर म्हणाले.

युक्रेनमध्ये युद्ध पेटलेले असून रशियाकडून मिळणार्‍या इंधनवायूच्या पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या युरोपिय देशांवर इंधन संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेने इंधनाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन अमेरिकेने केले होते. पण ओपेकचे नेतृत्व करणार्‍या सौदी अरेबिया आणि युएई या देशांनी हौथी बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्यांकडे लक्ष वेधून अमेरिकेची ही मागणी अमान्य केली होती. सौदीकडून इंधनाची आयात वाढविण्यात ब्रिटन देखील अपयशी ठरला होता.

इंधन उत्पादनअशा परिस्थितीत, इराणने आपल्या इंधनाचे उत्पादन व निर्यात २०१८ सालच्या निर्बंधांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याची घोषणा करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर, इराण इंधनाच्या जागतिक बाजारपेठेतील आपले स्थान भक्कम करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत यामुळे मिळू लागले आहेत. त्याचा इंधनाच्या बाजारपेठेवर अमेरिकेला अपेक्षित असलेला परिणाम होऊ शकतो. इराणचे इंधन अधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर, अवाक वाढून इंधनाचे दर नियंत्रणात येऊ शकतील. त्याचा वापर करून इंधनाचे उत्पादन वाढविण्यास नकार देणार्‍या सौदी व इतर इंधन उत्पादक देशांना धक्का देण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाईल.

मात्र त्यासाठी इराणबरोबरील अणुकरार मार्गी लागणे आवश्यक आहे. इस्रायल तसेच इराणच्या विरोधात खड्या ठाकलेल्या इतर आखाती देशांचा विरोध लक्षात घेता, अमेरिकेसाठी इराणबरोबर अणुकरार करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही, हे गेल्या काही दिवसात उघड झाले आहे.

leave a reply