पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून भारताला अण्वस्त्रांची धमकी

अण्वस्त्रांची धमकीइस्लामाबाद – पाकिस्तान हा कुणी कानशीलात लगावल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारा देश नाही, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देणारा देश आहे. पाकिस्तानच्या विरोधात विधाने करताना भारताने याचे भान ठेवावे आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे, हे देखील भारताने विसरू नये, असे अकलेचे तारे पाकिस्तानच्या मंत्री शाजिया मर्री यांनी तोडले होते. त्यावर प्रतिक्रिया उमटल्यानंतर, पाकिस्तान हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याची सारवासारव मर्री यांना करावी लागली. मात्र हे ‘जबाबादरीचे’ भान येण्याआधी केवळ भारतीयच नाही तर पाकिस्तानच्या पत्रकारांनीही मर्री यांची खिल्ली उडविली होती.

संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावर दहशतवादाचे आरोप केले होते. त्याच्याही आधी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतच पाकिस्तानात दहशतवाद माजवित असल्याचे दावे ठोकले होते. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हफीज सईद याच्या लाहोरमधील घराजवळ बॉम्बस्फोट झाला होता. हा बॉम्बस्फोट भारताने घडविल्याचा हास्यास्पद दावा खार यांनी केला होता. या साऱ्या आरोपांना उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ओसामा बिन लादेनचा पाहुणाचार करणारा पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे, याचा जगाला विसर पडलेला नाही, याची जाणीव करून दिली. जयशंकर यांनी ही चपराक लगावल्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अनुचित शब्दात टीका केली होती. त्यालाही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सणसणीत प्रत्युत्तर दिले.

अशा परिस्थितीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रीमंडळाच्या सदस्या शाजिया मर्री यांनी भारताला आण्विक धमकी दिली. पाकिस्तान अण्वस्त्रधारी आहे, हे भारताने विसरता कामा नये, असे सांगून मर्री यांनी आपलीच फजिती करून घेतली. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर भारतीय शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाकिस्तानात भाजीपाला व फळफळावर पाठविण्याचे बंद केले होते. विशेषतः भारतातून येणारे टॉमेटो बंद झाल्याने पाकिस्तानला त्यावेळी त्याची फार मोठी झळ बसली होती. यामुळे वैतागलेल्या पाकिस्तानच्या एका पत्रकाराने भारतावर अण्वस्त्रे टाकण्याची धमकी दिली होती. आता पाकिस्तानच्या मंत्री देखील बेजबाबदारपणे बेताल विधाने करीत असल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानच्याच काही पत्रकारांनी मर्री यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर भारतीय माध्यमांनी मर्री यांची खिल्ली उडविली असून यानंतर त्यांना आपल्या विधानांवर सारवासारव करावी लागली. पाकिस्तान हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचा दावा मर्री यांनी सोशल मीडियावर केला आहे.

leave a reply