लुसाका/वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर असलेल्या कर्जाच्या समस्येमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे स्थैर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे केवळ स्वार्थी हितसंबंधांसाठी इतर देशांविरोधात तथ्यहीन आरोप करण्याचा अधिकार अमेरिकेला नाही’, अशा खरमरीत शब्दात चिनी दूतावासाने अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांच्यावर टीकास्त्र सोडले. येलेन सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी झांबियावरील चिनी कर्जाबाबत टिप्पणी केली होती. त्यावर चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे.
चीन व रशिया आफ्रिका खंडातील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असतानाच अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन गेल्या आठवड्यात आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाल्या होत्या. आपल्या दौऱ्यात त्यांनी सेनेगल व झांबियाला भेट दिली असून मंगळवारी त्या दक्षिण आफ्रिकेत उतरल्याचे सांगण्यात येते. सेनेगल व झांबियात झालेल्या कार्यक्रमांदरम्यान येलेन यांनी आफ्रिकेला कर्जाच्या विळख्यात अडकवू पाहणाऱ्या चीनवरही टीकास्त्र सोडले होते.
‘झांबियातील कर्जाची पुनर्रचना होणे आवश्यक आहे. सध्या असलेल्या कर्जाच्या बोज्याचे विपरित परिणाम झांबियाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. या देशातील कर्जाची समस्या सोडविण्यात चीन हा मोठा अडथळा ठरला आहे. चिनी नेते व अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पुढील काळातही झांबियाच्या कर्जाच्या मुद्यावर चीनसह इतर सर्व देशांवर दबाव आणण्यासाठी अमेरिका प्रयत्न करील’, या शब्दात अमेरिकी अर्थमंत्री येलेन यांनी चीनला लक्ष्य केले. त्यापूर्वी सेनेगलमधील बैठकीत, चकचकीत व अपारदर्शी करारांपासून आफ्रिकी देशांनी दूर रहावे, असे येलेन यांनी बजावले होते.
अमेरिकी अर्थमंत्र्यांची ही वक्तव्ये चीनला चांगलीच झोंबली असून झांबियातील दूतावासाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दूतावसाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात येलेन यांनी आधी अमेरिकेतील कर्जाची व संभाव्य दिवाळखोरीची समस्या दूर करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याचवेळी जागतिक अर्थव्यवस्थेतील कर्जाच्या वाढत्या बोज्यासाठी अमेरिकेची धोरणे कारणीभूत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला. येलेन यांनी आपल्या देशाची पत राखण्याचे काम करावे व इतर देशांच्या निर्णयांमध्ये ढवळाढवळ करू नये, असेही चिनी दूतावासाने बजावले आहे.
झांबियावर सध्या 17 अब्ज डॉलर्सचे कर्ज असून त्यातील 50 टक्क्यांहून अधिक हिस्सा चिनी कर्जाचा असल्याचे सांगण्यात येते.