इराणवर हल्ला चढविण्याची हीच योग्य वेळ

- इस्रायलच्या माजी नौदल अधिकाऱ्याचा दावा’

जेरूसलेम – ‘इराण शंभर टक्के अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आत्ताच इराणवर हल्ला चढविणे योग्य ठरेल’, असे इस्रायलच्या नौदलाचे माजी अधिकारी एलीझर मॅरोम यांनी सुचविले आहे. इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक स्तरावर पोहोचला असून एक नाही तर कित्येक अणुबॉम्ब बनविण्याची क्षमता इराणने प्राप्त केली आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी दिला होता. त्यावर इस्रायली संरक्षणदलांच्या माजी अधिकारी व सामरिक विश्लेषकांकडून अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहे. इराणच्या इस्फाहन येथील क्षेपणास्त्रांच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे इस्रायल असल्याच्या बातम्या येत असताना, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या देशाच्या नेतृत्त्वाला इराणवर आत्ताच हल्ले चढविण्याचे दिलेले सल्ले लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून इराणबरोबरच्या अणुकराराबाबत अमेरिका व युरोपिय देशांनी सुरू केलेल्या वाटाघाटी रखडल्या आहेत. पाश्चिमात्य देश युक्रेनच्या युद्धात व्यस्त असताना या काळात इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग करीत आहे. इराणने 60 टक्के शुद्धतेच्या युरेनियमचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केल्याचा दावा आयोगाचे प्रमुख ग्रॉसी यांनी केला होता. इराणने अद्याप अणुबॉम्बची निर्मिती केलेली नाही, असे सांगून ग्रॉसी यांनी पाश्चिमात्य देशांना इराणला रोखण्यासाठी आपले प्रयत्न दुपटीने वाढविण्याचे आवाहन केले होते.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी दिलेल्या या इशाऱ्यावर अमेरिका व युरोपिय देशांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर सर्वात आधी आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असेल, याची जाणीव असलेल्या इस्रायलमधून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. इस्रायलच्या नौदलाचे निवृत्त वाईस ॲडमिरल एलीझर मॅरोम यांनी इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना इराणवर कारवाईची मागणी केली. इराणकडे 60 टक्के शुद्धतेचे युरेनियम असले तरी ते कधीही याचे प्रमाण 90 टक्क्यांवर अर्थात अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या स्तरावर नेऊ शकतात, याकडे मॅरोम यांनी लक्ष वेधले.

म्हणूनच इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी, इराणवर हल्ला चढविण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या वर्षातच ही कारवाई करावी लागेल, असे मॅरोम यांनी सुचविले. काही दिवसांपूर्वीच इस्रायलचे संरक्षण सल्लागार व संरक्षणदलप्रमुखांनी इराणच्या लष्करी तळांवर हल्ल्याची तयारी झाल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे आदेश मिळताच इराणवर ही कारवाई केली जाईल, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये इराणच्या इस्फाहन तसेच इराक-सिरियाच्या सीमेजवळील इराणसंलग्न गटांवर ड्रोन हल्ले झाले आहेत. यासाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा आरोप इराणमधून होऊ लागला आहे. विस्तवाशी खेळणाऱ्यांचेच हात अखेरीस त्यानेच पोळले जातात, अशी धमकी इराणने दिली आहे. अशा परिस्थितीत, इराणकडून प्रतिहल्ला अपेक्षित असलेल्या इस्रायलने याला तोंड देण्याची सज्जता ठेवली आहे. ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इराण परदेशातील इस्रायली नागरिकांना लक्ष्य करू शकतो, हे लक्षात घेऊन इस्रायलने आपले दूतावास व सुरक्षा यंत्रणांना सावध केले आहे.

leave a reply