पुढील जागतिक साथीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय सज्ज नाही

- रेडक्रॉसचा इशारा

जीनिव्हा – गेली तीन वर्षे कोरोनाच्या भयावह साथीला तोंड देणारा आंतरराष्ट्रीय समुदाय पुढील जागतिक साथीला तोंड देण्यासाठी अजूनही सज्ज झालेला नाही, असा गंभीर इशारा ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द रेड क्रॉस’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेने दिला आहे. त्याचवेळी नजिकच्या काळात कधीही अनपेक्षितपणे जगात नव्या साथीची सुरुवात होऊ शकते, असेही ‘रेड क्रॉस’ने बजावले आहे. जागतिक महामारी व मोठ्या नैसर्गिक आपत्ती यांचा मुकाबला एकाच वेळी करावा लागू शकतो, याकडेही या स्वयंसेवी संस्थेने लक्ष वेधले आहे. हा इशारा समोर येत असतानाच कोरोनाचा जागतिक साथ म्हणून असलेला धोका अद्याप संपलेला नसून ही साथ अजूनही ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ असल्याची जाणीव ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) करून दिली.

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेली कोरोनाची साथ जागतिक महामारी असल्याचे जानेवारी 2020 मध्ये घोषित करण्यात आले होते. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द रेड क्रॉस’ने दोन स्वतंत्र अहवाल प्रकाशित केले. ‘वर्ल्ड डिझास्टर्स रिपोर्ट 2022’ व ‘एव्हरीवन काऊंटस्‌‍ रिपोर्ट’ अशी या अहवालांची नावे आहेत. या अहवालांमध्ये कोरोनाच्या साथीने उडविलेल्या हाहाकाराची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या साथीने 65 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला. आतापर्यंतच्या इतिहासात दुष्काळ, भूकंप अथवा वादळांसारख्या मोठ्या आपत्तींमध्येही इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली नाही, याकडे ‘रेड क्रॉस’च्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

‘कोरोनाची साथ ही आंतरराष्ट्रीय समुदायासाठी इशाराघंटा होती. यातून मिळालेले धडे लक्षात घेऊन पुढे येणाऱ्या जागतिक साथीला तोंड देण्यासाठी तयारी करायला हवी. पण त्यादृष्टीने सज्जता दिसत नसून नवी साथ कधीही धडकू शकते. यासाठी अद्यापही आंतरराष्ट्रीय समुदाय तयार दिसत नाही’, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. पुढील जागतिक साथीचा मुकाबला करण्यासाठी विश्वासार्हता निर्माण करणे, समानता व तळागाळापर्यंत मजबूत नेटवर्क उभारणे यांची आवश्यकता असल्याचा सल्लाही अहवालात देण्यात आला. त्याचवेळी पुढील काळात कदाचित एकाच वेळेस अनेक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असून त्यासाठी अधिक वेगाने व भक्कम तयारी करणे गरजेचे आहे, असेही बजावण्यात आले आहे.

‘रेड क्रॉस’च्या अहवालात, हवामानबदलामुळे नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. येत्या शतकात जगाला एकापाठोपाठ एक मोठ्या आपत्ती तसेच भयावह साथींच्या उद्रेकांचा सामना करावा लागेल, याकडेही संस्थेच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले. जागतिक साथींना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या विधेयकावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून पुढील दोन वर्षात वेगाने पावले उचलावी लागतील, असेही सुचविण्यात आले आहे. जगभरातील देशांनी आरोग्यक्षेत्रावर करण्यात येणारा खर्च जीडीपीच्या एक टक्के करावा तसेच जागतिक स्तरावर आरोग्यक्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद 15 अब्ज डॉलर्सने वाढवायला हवी, अशा शिफारसी अहवालात करण्यात आल्या आहेत.

leave a reply