मध्यवर्ती बँकांकडून 2022 साली एक हजार टनांहून अधिक सोन्याची खरेदी

- 1967 सालानंतरचा उच्चांक असल्याचा ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’चा दावा

लंडन – जगभरातील मध्यवर्ती बँकांनी 2022 साली सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकांकडून एक हजार टनांहून अधिक सोन्याची खरेदी करण्यात आली. खरेदी करणाऱ्या देशांमध्ये रशिया, चीन व भारतासह तुर्की, इजिप्त, उझबेकिस्तान व इराक हे देश आघाडीवर आहेत. जुलै ते नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक सोने खरेदी झाल्याकडे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने लक्ष वेधले आहे.

नोव्हेंबर महिन्यात ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या व्यवहारांची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर चीनसह अनेक देशांनी सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे सांगण्यात आले होते. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 399.3 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. यातील सुमारे 90 टन सोने तुर्की, उझबेकिस्तान व भारताच्या मध्यवर्ती बँकांकडून खरेदी करण्यात आले होते.

दुसऱ्या बाजूला चीन व रशियासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असल्याचे सांगण्यात येते. रशिया हा सोन्याचा आघाडीचा उत्पादक देश आहे. युक्रेन युद्धामुळे देशातील सोन्याच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनने 2022 साली 32 टन सोने खरेदी केल्याची माहिती मध्यवर्ती बँकेकडून देण्यात आली होती. मात्र त्याव्यतिरिक्त चीनने रशियाकडूनही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याचे वृत्त जपानी माध्यमांनी दिले होते.

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, 2022 सालात मध्यवर्ती बँकांकडून 1 हजार, 138 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. यात तुर्की आघाडीवर असून या देशाने 100 टनांहून अधिक सोने खरेदी केले आहे. त्याव्यतिरिक्त कतार, संयुक्त अरब अमिरात यासारख्या आखाती देशांकडूनही सोन्याची खरेदी करण्यात येत असल्याकडे ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने लक्ष वेधले. मध्यवर्ती बँकाकडून जवळपास 70 अब्ज डॉलर्सचे सोने खरेदी करण्यात आले असून 1967 सालानंतरचा हा उच्चांक असल्याचे अहवालात सांगण्यात आले. पुढील वर्षातही हा कल कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

leave a reply