भूकंपाचा फायदा घेऊन इराणने सिरियात शस्त्रास्त्रांची तस्करी केल्यास इस्रायल कारवाई करील

इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्याचा इशारा

israel jetतेल अविव – सिरियातील भूकंपग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इराणने पुढाकार घेतला आहे. पण या मानवतावादी सहाय्याच्या नावाखाली इराण सिरियात शस्त्रतस्करी करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती इस्रायलला मिळाली आहे. असे झाले तर इस्रायल यावर लष्करी कारवाई केल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिला. सौदी अरेबियाच्या वर्तमानपत्राशी बोलताना इस्रायली अधिकाऱ्याने ही माहिती दिली. याआधी इस्रायलने सिरियातील इराणची वाहने तसेच गोदामांना लक्ष्य करून शस्त्रतस्करी उधळल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या या नव्या इशाऱ्याचे गांभीर्य वाढले आहे.

आठवड्यापूर्वी तुर्की व सिरियाला हादरवून टाकणाऱ्या भूकंपातील बळींची संख्या 35 हजारांवर गेली आहे. तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून सिरियातील भूकंपात 3500 हून अधिकजणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. पण सिरियामधील बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. गेली दहा वर्षे गृहयुद्धाचे लक्ष्य ठरलेला सिरिया सध्या अस्साद सरकार, कुर्द बंडखोर, तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटना आणि आयएस यांच्यात विभागला गेला आहे. भूकंपाचे हादरे बसलेल्या सिरियाच्या उत्तरेकडील प्रांतातील काही भागावर अस्साद सरकार तर काहीवर तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या भागांमध्ये आंतरराष्ट्रीय सहाय्य पोहोचविणे अवघड बनल्याची तक्रार संयुक्त राष्ट्रसंघ करीत आहे.

syria iran quake aidअशा परिस्थितीत अस्साद सरकारच्या ताब्यातील भूभागासाठी इराणने मोठ्या प्रमाणात सहाय्य सुरू केले आहे. इराणची प्रवासी विमाने मदत घेऊन सिरियामध्ये दाखल झाल्याचे फोटोग्राफ्स समोर आले होते. पण इराणच्या या सहाय्यावर इस्रायलने संशय व्यक्त केला आहे. इराण सिरियातील परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे. भूकंपग्रस्तांसाठी मानवतावादी सहाय्य पुरविण्याच्या नावाखाली इराण सिरियातील दहशतवादी संघटना तसेच सिरियामार्गे लेबेनॉनमधील हिजबुल्लाहला शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप इस्रायली अधिकाऱ्यांनी केला. ‘एलाफ’ या सौदी अरेबियाच्या वर्तमानपत्राने इस्रायली लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली. इराण या शस्त्रतस्करीच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती इस्रायलला मिळालेली आहे. इराणने सिरियातील संकटाचा अशारितीने फायदा घेण्याचा प्रयत्न केलाच, तर इस्रायल याविरोधात लष्करी कारवाई करताना अजिबात कचरणार नाही, असे इस्रायली अधिकाऱ्याने बजावले आहे.

याआधी इस्रायलने सिरियातील इराण, इराणसंलग्न तसेच हिजबुल्लाहची ठिकाणे व वाहनांना लक्ष्य केले होते. सिरियामध्ये किमान 200 हवाई कारवाई केल्याची कबुली इस्रायलने तीन वर्षांपूर्वी दिली होती. पण त्यानंतर सिरियात केलेल्या कारवाईबाबत इस्रायलने बोलण्याचे टाळले आहे. मात्र इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणारी शस्त्रास्त्रांची तस्करी हाणून पाडणार असल्याचे इस्रायलने बजावले आहे. अशा परिस्थितीत, इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सौदीच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून इराणला दिलेला इशारा अतिशय गंभीर ठरतो.

leave a reply