अमेरिकन लोकप्रतिनिधी तैवानमध्ये दाखल

तैपेई – अमेरिकेचे लोकप्रतिनिधी पाच दिवसांच्या तैवान भेटीवर दाखल झाले आहेत. या दौऱ्यात अमेरिकन लोकप्रतिनिधी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतील. तसेच अमेरिका व तैवानमधील सेमीकंडक्टर्सच्या नव्या सहकार्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकन लोकप्रतिनिधी रो खन्ना, टोनी गोंझालेस, जेक ऑशिंक्लोस, जॉनथन जॅक्सन सोमवारी सकाळी तैवानची राजधानी तैपेईमध्ये दाखल झाले. सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील तैवानची भूमिका समजून घेण्यासाठी आपण या दौऱ्यावर दाखल झाल्याचे रो खन्ना यांनी म्हटले आहे. तसेच आपला हा दौरा कुठल्याही प्रकारे चीनविरोधी नसल्याचे रो खन्ना यांनी स्पष्ट केले. बायडेन प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणांनुसार तैवानबरोबरच्या सहकार्याला महत्त्व देण्यासाठी आणि या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आपण तैवानमध्ये दाखल झाल्याचा दावा खन्ना यांनी केला. या स्पष्टीकरणानंतरही अमेरिकन लोकप्रतिनिधींचा हा तैवान दौरा अमेरिका व चीनमधील नव्या वादाचे कारण ठरू शकतो, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

leave a reply