अंतराळातील सुरक्षेला चीनपासून मोठा धोका

- अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा

म्युनिक – अंतराळाचा पारंपरिकरित्या होत असलेला वापर आता बदलू लागला आहे. चीनपासून अंतराळाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका मोठा आहे. त्यामुळे अमेरिकेलाही अंतराळ सुरक्षेबाबतच्या आपल्या धोरणात बदल करावा लागेल’, असा इशारा अमेरिकेच्या ‘स्पेस ऑपरेशन्स’चे प्रमुख जनरल ब्रॅडली चान्स साल्झमन यांनी दिला. अंतराळावरील वर्चस्वासाठी सुरू झालेली शस्त्रस्पर्धा चिंतेचा विषय असल्याचे जनरल साल्झमन म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून स्पाय बलून प्रकरणावरुन अमेरिका व चीनमध्ये शाब्दिक चकमक झाली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनचे स्पाय बलून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हानीकारक नव्हते, असा दावा केला आहे. मात्र चीनने अमेरिकेच्या धोरणात्मक लष्करी तळांवर हेरगिरी करण्यासाठीच स्पाय बलून रवाना केल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाने केला होता.

जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू असलेल्या सुरक्षा विषयक बैठकीतही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वँग ई यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.

या बैठकीला उपस्थित असलेले अमेरिकेच्या स्पेस ऑपरेशनचे प्रमुख जनरल साल्झमन यांनी माध्यमांशी बोलताना चीनपासून अंतराळातील सुरक्षेला धोका असल्याचे जाहीर केले. चीननंतर रशियाकडून असलेला धोका देखील विचार करायला लावणारा असल्याचे जनरल साल्झमन म्हणाले. तर अंतराळ सुरक्षेच्या स्पर्धेत अमेरिका चीन व रशियाच्या तुलनेत फार पिछाडीवर नाही, याची आठवण साल्झमन यांनी करुन दिली.

leave a reply