‘ऑपरेशन दोस्त’मुळे भारताची प्रतिमा अधिकच उजळली

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – तुर्की व सिरियातील भीषण भूकंपानंतर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी झालेल्या ‘एनडीआरएफ’ तसेच भारतीय लष्कराच्या पथकाची पंतप्रधानांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. मायदेशी परतलेल्या या पथकांच्या सदस्यांची भेट घेऊन पंतप्रधानांनी ‘तुम्ही मानवतेसाठी केलेल्या कार्याचा साऱ्या देशाला अभिमान वाटत आहे’, असे उद्गार काढले. आपत्तीच्या काळात निरपेक्ष सहाय्यासाठी सर्वात आधी धाव घेणारा देश अशी भारताची जगभरातील प्रतिमा यामुळे अधिकच दृढ झाली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

६ फेब्रुवारी रोजी तुर्की व सिरियामध्ये आलेल्या भयंकर भूकंपात ४५ हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. हजारो इमारती कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्याचे समोर आले होते. अशा परिस्थितीत तुर्की व सिरियाला तातडीने सहाय्य करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला. भारतीय वायुसेनेची ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ ही अवजड वाहतूक करणाऱ्या विमानांनी मानवी सहाय्य घेऊन तुर्कीला उड्डाण केले. तसेच भारताच्या आपत्ती निवारक दल-एनडीआरएफची तसेच भारतीय लष्कराच्या वैद्यकीय पथकांनी देखील तुर्की व सिरियातील बचावकार्यात सहभाग घेतला.

या दोन्ही देशांमध्ये भारताने केलेल्या बचावकार्य तसेच वैद्यकीय सहाय्याची दखल साऱ्या जगाने घेतली. तुर्कीच्या इस्केन्दरू इथे भारतीय पथकाने तातडीने ३० बेडची क्षमता असलेले सुसज्ज असे फिल्ड हॉस्पिटल उभे केले. इथे सुमारे चार हजार जणांनी उपचार घेतले. याबरोबरच कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय पथकाने बहुमोल सहाय्य केले. एनडीआरएफच्या पथकासोबत असलेल्या श्वानांनी या कामी फार मोठी कामगिरी बजावली होती. हे सहाय्य व भारताकडून मिळालेली मिळालेली मदत, यासाठी तुर्कीने भारताचे आभार मानले होते.

तुर्कीने भारताच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेचा विचार न करता भारताने केलेले हे मानवतावादी सहाय्य केले आहे. तुर्कीच्या जनतेने यासाठी कृतज्ञता व्यक्त केली असून मायदेशी परतणाऱ्या भारतीय पथकाला तुर्कीच्या भूकंपग्रस्तांनी भावपूर्ण निरोप दिल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे भारताची जगभरातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे. पंतप्रधानांनी एनडीआरएफ तसेच या बचावकार्यात सहभागी झालेल्या इतर पथकांची प्रशंसा करताना, या कार्याचा फार मोठा प्रभाव जगभरात पडल्याची जाणीव करून दिली.

आपत्तीच्या काळात मानवतावादी सहाय्यासाठी सर्वात आधी धाव घेणारा निरपेक्ष देश म्हणून जगभरात भारताकडे विश्वासाने पाहिले जात आहे. नेपाळचा भूकंप असो वा मालदीव, श्रीलंकेमधील संकट असो, भारत नेहमीच सहाय्य करण्यासाठी पुढे जाणारा देश आहे. साऱ्या विश्वाला आपले कुटुंब मानणारा भारत या कुटुंबाच्या कुठलाही सदस्य संकटात असताना सर्वात आधी सहाय्य पुरवितो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. भारताचा तिरंगा घेऊन आपण जेव्हा कुठे मानवी सहाय्यासाठी जातो, त्यावेळी आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळतो व मोठ्या विश्वासाने आपले स्वागत केले जाते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

leave a reply