जेरूसलेम – ‘सध्या इस्रायल सर्वच बाजूंनी घेरलेला आहे. इराण वेस्ट बँक आणि गाझापट्टीत शस्त्रास्त्रांची तस्करी करीत आहे. इराण व हिजबुल्लाह सिरियामध्ये तळ ठोकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र इस्रायल इराण व हिजबुल्लाहला सिरियातून पळवून लावल्यावाचून राहणार नाही’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री योएव गॅलंट यांनी दिला. गेल्या चार दिवसात सिरियातील इराणच्या तळांवर तीन वेळा हवाई हल्ले चढविल्यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी हा इशारा दिला.
इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा शत्रूंवरील कारवायांवर परिणाम होणार नाही, असा संदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रविवारी दिला होता. दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या देशांना आम्ही याची मोठी किंमत चुकती करण्यास भाग पाडत आहोत, असे सूचक उद्गार यावेळी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी काढले होते. इस्रायलने जाहीररित्या सिरियातील हवाई कारवाईची जबाबदारी स्वीकारली नसली तरी आपल्या सूचक उद्गारातून गेल्या चार दिवसात सिरियातील इराणच्या तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचे संकेत पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिले होते.
त्यापाठोपाठ इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी देखील लष्कराच्या जवानांची भेट घेतल्यानंतर सिरियात तळ ठोकून इस्रायलविरोधी कारवाई करण्याच्या इराण, हिजबुल्लाहच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘सिरियाचा वापर करून इस्रायलवर हल्ले चढविण्याचे इराण, हिजबुल्लाहचे प्रयत्न याआधी कधीही यशस्वी ठरले नव्हते, आत्ताही यशस्वी ठरलेले नाही आणि यापुढेही यशस्वी ठरणार नाही’, असे गॅलंट म्हणाले. त्याचबरोबर गाझापट्टीबरोबरच वेस्ट बँकमधील शहरांपर्यंत शस्त्रास्त्रे पोहोचविणाऱ्या इराण व हिजबुल्लाहला त्यांच्या मूळ देशी पळवून लावणार असल्याची घोषणा गॅलंट यांनी केली.
दरम्यान, रविवारी सिरियातून इस्रायलच्या हद्दीत ड्रोनने घुसखोरी केली होती. इस्रायलच्या लष्कराने हे ड्रोन पाडले असून त्यानंतरच इस्रायलने सिरियाची राजधानी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हवाई हल्ले चढविले. इस्रायलच्या हद्दीत घुसलेले सदर ड्रोन इराणी बनावटीचे असल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे.