बांगलादेशमधील फॅक्टरीला लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यू

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील नारायणगंज भागात एका ‘फूड प्रोसेसिंग फॅक्टरी’ला लागलेल्या आगीत तब्बल 52 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ‘हाशेम फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज’ मध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे 30 जण जखमी झाले असून बळींची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. फॅक्टरीच्या इमारतीत असलेली रसायने व प्लॅस्टिकमुळे आग लागल्याची माहिती अग्नीशमनदलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

बांगलादेशमधील फॅक्टरीला लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यूराजधानी ढाकापासून 20 किलोमीटर्सवर असलेल्या रुपगंजमधील ‘हाशेम फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज’ला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. सहा मजली फॅक्टरीत सुरुवातीला तळमजल्यावर आग लागली. ही आग विझल्यानंतर काही काळाने फॅक्टरीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग इतर मजल्यांवर पसरली. फॅक्टरीत असलेल्या तेलाच्या साठ्यांमुळे जवळपास 24 तास आग भडकत होती.

आग लागली त्यावेळी अनेक कामगार घरी गेले असले तरी जवळपास 100हून अधिक जण कारखान्यात होते, असे सांगण्यात येते. बळी गेलेल्यांमध्ये महिला व मुलांचा समावेश असल्याचे मानले जाते. बांगलादेशमधील फॅक्टरीला लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यूआगीतून वाचविण्यासाठी काही जणांनी इमारतीतून खाली उड्या मारल्याचे समोर आले असून, त्यातही अनेक जण जखमी झाले आहेत.

बांगलादेशमध्ये गेल्या दशकभरात लागलेली ही तिसरी मोठी आग आहे. 2012 साली एका कपड्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 112 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर 2016 साली एका पॅकिंग फॅक्टरीत घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणार्‍या या दुर्घटनांमागे कारखान्यातील सुरक्षाविषयक नियमांची होणारी पायमल्ली व त्याकडे यंत्रणांचे होणारे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते.

leave a reply