कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देशांमध्ये सुमारे ६० लाख जण बेकार

- अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी घसरली

ब्रुसेल्स – युरोपिय देशांमधील कोरोनाची तीव्रता पुन्हा एकदा वाढत असतानाच आर्थिक पातळीवरही युरोपला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीत मंदावलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे सुमारे ६० लाख जणांना बेकारीचा फटका बसल्याची माहिती युरोपिय अभ्यासगटाने दिली आहे. फ्रान्स, पोलंड, इटली व ग्रीस या देशांना सर्वाधिक झळ बसल्याचे ‘युरोफाऊंड’ या गटाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यापूर्वी युरोपिय महासंघाने जाहीर केलेल्या माहितीतही युरोपिय देशांची अर्थव्यवस्था २०२० सालात ६.२ टक्क्यांनी घसरल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

युरोपिय महासंघातील कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ३२ लाखांवर गेली असून ५ लाख, ६२ हजार जण दगावल्याचे सांगण्यात येते. महासंघातील तीन चतुर्थांश सदस्य देशांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून त्यात पूर्व व मध्य युरोपातील देशांचा समावेश आहे. युरोपात सध्या कोरोना साथीची तिसरी लाट सुरू असल्याचे सांगण्यात येते. या लाटेमुळे अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनसह कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, युरोपिय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा मोठे धक्के बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरात अर्थव्यवस्थेतील घसरण व बेकारीसंदर्भात जाहीर झालेली आकडेवारी त्याची सुरुवात असू शकते, असे सांगण्यात येत आहे. युरोपिय महासंघाच्या अधिकार्‍यांकडून होणार्‍या वेगवेगळ्या घोषणा व

वक्तव्येही त्याला दुजोरा देणारी ठरत आहेत. युरोपियन कमिशनने नुकतीच ३७ अब्ज युरोच्या विशेष अर्थसहाय्याची घोषणा केली असून, या माध्यमातून आरोग्य क्षेत्र आणि छोट्या व मध्यम उद्योगांना सहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

ही घोषणा करताना युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकारी माग्रेथ वेस्टागर यांनी, कोरोनामुळे युरोपिय जनतेचे आयुष्य व रोजगाराच्या संधी या दोन्ही गोष्टी पणाला लागल्याची कबुली दिली. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा मोठा फटका उद्योगक्षेत्राला बसला असून युरोपियन कंपन्या अजूनही त्यातून बाहेर पडू शकलेल्या नाहीत, या शब्दात परिस्थिती अद्याप निवळली नसल्याचे वेस्टागर यांनी सांगितले. युरोपातील आघाडीची वाहननिर्मिती कंपनीने, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला तब्बल ९.७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे नुकतेच जाहीर केले होतेे. तर युरोझोनमधील कंपन्यांवरील कर्जाचा बोजा तब्बल ४०० अब्ज युरोंनी वाढल्याची माहितीही समोर आली आहे. ही बाब वेस्टागर यांच्या वक्तव्याला दुजोरा देणारी ठरते.

‘आयएनजी’ या वित्तसंस्थेतील प्रमुख अर्थतज्ज्ञ मार्सेल क्लॉक युरोपातील अर्थव्यवस्थेबाबत अंधकारमय स्थिती असल्याचे बजावले आहे. पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे २०२१ सालातील पहिल्या तिमाहितही युरोपिय अर्थव्यवस्था मंदावणार असून फक्त हा बदल किती टक्क्यांचा असेल, इतकाच काय तो प्रश्‍न आहे, असा इशारा क्लॉक यांनी दिला. ‘कॅपिटल इकॉनॉमिक्स’मधील अर्थतज्ज्ञ जेसिका हिंड्स यांनी, युरोपातील लसीकरणाचा वेग अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या लसीकरण मंदगतीने सुरू असल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल, असे हिंड्स यांनी म्हटले आहे.

leave a reply