इस्रायलने इराणच्या कंटेनर जहाजावर हल्ला चढविला

- इराणचा आरोप

तेहरान – गेल्या आठवड्यात भूमध्य सागरी क्षेत्रात इराणच्या मालवाहू जहाजावर झालेल्या स्फोटामागे इस्रायल असल्याचा आरोप इराणने केला आहे. या घटनेचे भौगोलिक स्थान पाहता, इस्रायलनेच हा हल्ला घडविला असावा, असे इराणच्या चौकशी समितीतील एका अधिकार्‍याने म्हटले आहे. तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या हल्ल्याबाबत इराणने चकार शब्द उच्चारलेला नव्हता. पण अमेरिकी वर्तमानपत्रातील बातमीनंतर इराणला कंठ फुटला असून हा देश आता थेट इस्रायलवर आरोप करू लागला आहे, या बदलाकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

बुधवारी भूमध्य समुद्रातून प्रवास करणार्‍या इराणच्या मालवाहू जहाजावर आग लागली होती. ‘शहर-ए कोर्द’ या जहाजावरील कंटेनर्समध्ये स्फोट होऊन ही आगी भडकली होती. या स्फोटात जीवितहानी झाली नाही. पण सदर जहाजाची मालकी असलेल्या इराणी कंपनीच्या प्रवक्त्याने हा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप केला. या घटनेनंतर इराणने सदर जहाजाच्या तपासासाठी आणि चौकशीसाठी पथक रवाना केले होते. सदर पथकाच्या एका सदस्याने इराणी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, हवाई हल्ल्यामुळे जहाजावर स्फोट झाल्याचे म्हटले आहे.

‘ज्या सागरी हद्दीत या जहाजावर स्फोट झाला ते भौगोलिक ठिकाण पाहता, या दहशतवादी हल्ल्यासाठी इस्रायलच जबाबदार आहे’, असा आरोप सदर अधिकार्‍याने केला. इराणच्या वृत्तवाहिन्यांनी संबंधित अधिकार्‍याचा आरोप उचलून धरला.

तर आपल्या जहाजावरील हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याची टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतिबझादेह यांनी केली. या हल्ल्यासाठी जबाबदार असणार्‍यांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही खतिबझादेह म्हणाले. गेल्या महिन्यात ओमानच्या आखातात इस्रायलच्या ‘हेलियॉस रे’ या मालवाहू जहाजावर गूढ स्फोट झाला होता. या स्फोटासाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. त्यामुळे इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला चढवून इस्रायलने ‘हेलियॉस रे’वरील हल्ल्याचा सूड घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. पण इस्रायलने हे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, इस्रायलवर आरोप करणार्‍या इराणच्या या दाव्यावर इस्रायलच्या आघाडीच्या माध्यमांनी अजब योगायोगाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. गेल्या बुधवारी इराणच्या मालवाहू जहाजावर आग लागली होती. इराणने या आगीबाबत बोलण्याचे टाळले होते. तसेच उघडपणे याबाबत कुणावरही आरोप करण्याचे टाळले होते.

पण अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने, २०१९ सालापासून इस्रायलने इराणच्या जहाजांवर १२ वेळा हल्ले चढविले, अशी माहिती देणारी बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी इराणने भूमध्य समुद्रात आपल्या जहाजावर झालेल्या आगीमागे इस्रायलच असल्याचा आरोप सुरू केला. हा चकीत करणारा योगायोग असल्याचा टोला इस्रायली माध्यमे लगावत आहेत.

leave a reply