जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र

राजौरी, पुंछ, किश्तवाडमध्ये अनेक ठिकाणी छापे

Jammu and Kashmirनवी दिल्ली – नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी राजौरीत नियंत्रण रेषेजवळील ढांगरी गावात झालेल्या दोन आयईडी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. गेल्या चार दिवसात केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन संघटना आणि चार जणांना दहशतवादी घोषित केले आहे. तर यानंतर आता सुरक्षादलांनी राजौरी, पुंछ, किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. किश्तवाडमध्ये घराघरात तपासणी केली जात असून व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच ढांगरी हल्याप्र्रकरणात 18 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. गेल्या अडीच वर्षात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. सुरक्षादलांनी राबविलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये विविध दहशतवादी संघटनांचे कमांडर व दहशतवादी मारले गेले असून त्यामुळे या दहशतवादी संघटना आपला अंतिम श्वास घेत आहेत. मात्र या संघटना आपले अस्तित्त्व दाखविण्यासाठी सतत मोठ्या हल्ल्याच्या योजना आखत आहेत. पाकिस्तानी संघटना नाव बदलून येथे दहशतवादी कारवाया करीत असून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद अजून जिवंत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 जानेवारीला ढांगरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांविरोधातील ही कारवाई अधिकच तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. सीमेजवळील गावांमध्ये अतिरिक्त सीआरपीएफ जवानांची तैनाती करण्यात आली. त्यानंतर आता लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, बीएसएफने दहशतवाद्यांविरोधात Action against terroristsकारवाई व्यापक केल्याचे दिसत आहे. गेल्या चार दिवसात ‘लश्कर-ए-तोयबा’ची प्रतिसंघटना असलेल्या ‘द रजिस्टंट फ्रन्ट-टीआरएफ’ आणि जैश-ए-मोहम्मदची प्रॉक्जी संघटना असलेल्या ‘पीपल्स ॲन्टी फॅसिस्ट फ्रन्ट’ (पीएएफएफ) या संघटनांना दहशतवादी घोषित करीत त्यांच्यावर बंदी टाकली. तसेच चार जणांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तानात लपून जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणाऱ्या अझिज अहमद अहनगर उर्फ अबू उस्मान या दहशतवाद्याचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानात लपलेल्या अरबाज अहमद मिर आणि मोहम्मद अमिन खुबैब या ‘लश्कर’च्या दहशतवाद्यांनाही यूएपीए कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. शनिवारी अश्फाक मकबूल दार या आणखी एकाला यूएपीएअंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले. दार सध्या सौदीमध्ये असून हिजबुलशी जोडलेला असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता या दहशतवादी संघटना व दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या चौघांच्या काश्मीरमधील ठिकाणांवर कारवाई सुरू झाली आहे. व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली असून किश्तवाडमध्ये घराघरात जाऊन तपासणी केली जात असल्याचे वृत्त आहे. मात्र याचे तपशील सुरक्षादलांनी जाहीर केलेले नाहीत. तसेच रविवारी पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी उधळून लावला. बालाकोट सेक्टरमध्ये घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार झाले असून मृत दहशतवाद्यांच्या जवळ दोन एके रायफल, एक शक्तीशाली आयईडी सापडला आहे. गेल्या दहा दिवसात पुंछमधील एलओसीवर घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न जवानांनी उधळला आहे.

leave a reply