रशियाविरोधी संघर्षात युक्रेनकडे काही आठवड्यांचाच अवधी शिल्लक आहे

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस व माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेटस्‌‍ यांचा इशारा

conflict against Russiaवॉशिंग्टन/किव्ह – रशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लष्करी क्षमतेसाठी हा देश पूर्णपणे पाश्चिमात्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत रशियाविरोधी संघर्षात टिकून रहायचे असेल तर युक्रेनकडे अवघ्या काही आठवड्यांचाच अवधी शिल्लक राहिलेला आहे, असा इशारा अमेरिकेच्या माजी वरिष्ठ मंत्र्यांनी दिला. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या आघाडीच्या दैनिकात अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस व माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेटस्‌‍ यांनी एका लेखात युक्रेनच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन कधीही माघार घेणार नाहीत कारण त्यांच्यासमोर पराभव हा पर्यायच उपलब्ध नाही, असेही अमेरिकेच्या माजी मंत्र्यांनी बजावले.

Ukraine has only a few weeksयुक्रेनच्या राजवटीने काही दिवसांपूर्वी रशियाविरोधात नव्या आक्रमक मोहिमेची योजना आखत असल्याचे जाहीर केले होते. या आक्रमणासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची गरज लागणार असल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. युक्रेनचे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल व्हॅलरी झॅल्युझ्नी यांनी, युक्रेनी लष्कराला 300 रणगाडे, 500 हॉवित्झर्स व 700 सशस्त्र वाहनांची गरज असल्याचा दावा केला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमिर झेलेन्स्की यांचा अमेरिका दौराही याच शस्त्रपुरवठ्याच्या मागणीसाठी होता, असे सांगण्यात येते.

झेलेन्स्की यांच्या दौऱ्यानंतर अमेरिकेने युक्रेनला पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा, ब्रॅडले लाईट इन्फंट्री टँक्स, सी-स्पॅरो मिसाईल्स अशा शस्त्रसहाय्याची घोषणा केली होती. तर जर्मनी व फ्रान्सनेदखील हलके रणगाडे तसेच सशस्त्र वाहने देण्याचे जाहीर केले होते. मात्र युक्रेनसाठी हे शस्त्रसहाय्य पुरेसे नसून पाश्चिमात्य देशांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू करायला हवा, अशी मागणी राईस व गेटस्‌‍ यांनी आपल्या लेखातून केली आहे.

‘युक्रेनमधून लक्षावधी नागरिक देश सोडून गेले आहेत. या देशातील पायाभूत सुविधा जवळपास नष्ट झाल्या आहेत. युक्रेनमधील खनिज संपत्ती व औद्योगिक क्षेत्रही उद्ध्वस्त झाले आहे. देशातील शेतजमीन मोठ्या प्रमाणात रशियाच्या नियंत्रणाखाली आली आहे. युक्रेन आर्थिक व लष्करीदृष्ट्या पूर्णपणे पाश्चिमात्य देशांवर व त्यातही प्रामुख्याने अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे’, याकडे अमेरिकेच्या माजी वरिष्ठ मंत्र्यांनी लक्ष वेधले. जर युक्रेन नजिकच्या काळात रशियाविरोधात यशस्वी मोहीम राबवू शकला नाही तर पाश्चिमात्य देशांची आघाडी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून रशियाबरोबर संघर्षबंदीसाठी भाग पाडू शकते, असा दावाही राईस व गेटस्‌‍ यांनी केला आहे.

दरम्यान, युक्रेनचे संरक्षणमंत्री ॲलेक्सी रेझ्नीकोव्ह यांनी आपला देश नाटोला असलेल्या धोक्याविरोधात मोहीम राबवित रक्त सांडवत असून त्याबदल्यात युक्रेनला शस्त्रास्त्रे मिळायला हवीत, अशी मागणी एका मुलाखतीदरम्यान केली.

हिंदी English

leave a reply