चिनी आक्रमणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून तैवानला प्रगत शस्त्रास्त्रे

वॉशिंग्टन/तैपेई – चीनकडून तैवानला देण्यात येणाऱ्या धमक्यांची तीव्रता वाढत असतानाच, अमेरिकेनेही तैवानबरोबरील संरक्षण सहकार्याला अधिक वेग दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी ६६ ‘एफ-१६’ लढाऊ विमानांसाठी केलेल्या करारानंतर, आता अमेरिकेने तैवानला नवी रॉकेट सिस्टिम, क्षेपणास्त्रे व लढाऊ विमानांचे पॉड्स पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या शस्त्रविक्रीला मंजुरी दिली आहे. तीन दिवसांपूर्वीच चीनने तैवानवरील संभाव्य हल्ल्याची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या युद्धसरावाचा व्हिडिओ प्रदर्शित करून तैवानला पुन्हा धमकावले होते.

प्रगत शस्त्रास्त्रे

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तैवानला एकामागोमाग दिलेल्या भेटींनी चीन बिथरला असून, चीनकडून तैवानविरोधातील हालचालीही जास्तच वाढल्याचे दिसून येत आहे. चीनच्या संरक्षणदलांकडून तैवानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी व टेहळणीचे प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील माजी लष्करी अधिकारी, विश्लेषक तसेच प्रसारमाध्यमे तैवानवर हल्ला चढविण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे दावेही करीत आहेत. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने गेल्या दोन महिन्यात तैवानच्या सीमेनजीक तब्बल पाच युद्धसराव केल्याचेही समोर आले आहे. या सरावांचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रसिद्ध करुन तैवानला सातत्याने धमकावण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेला व्हिडिओही त्याचाच भाग मानला जातो.

चीनची सरकारी वृत्तवाहिनी ‘सीसीटीव्ही’ने व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ एका बेटावर ताबा मिळविण्याची तालीम करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तैवानच्या सीमेनजीक असणाऱ्या फुजीआन व ग्वांगडोंग प्रांतात ‘लाईव्ह फायर’ युद्धसराव झाल्याची माहिती देण्यात आली. सरावात, अँफिबियस लँडिंग क्राफ्ट, अटॅक हेलिकॉप्टर्स व क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. चीनने तैवानवरील हल्ल्यासाठी तयार केलेल्या ‘७३ ग्रुप आर्मी’ या तुकडीकडून हा सराव करण्यात आल्याची माहितीही सरकारी वृत्तवाहिनीने दिली. शनिवारी तैवानच्या ‘नॅशनल डे’ला जगभरातून मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर इशारा देण्यासाठी चीनकडून सरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा तैवानमधील सूत्रांनी केला.

प्रगत शस्त्रास्त्रे

चीनकडून तैवानवर सातत्याने दडपण टाकण्यात येत असतानाच अमेरिकेने तैवानची संरक्षणसज्जता वाढविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला नवी शस्त्रास्त्रे विकण्यास मंजुरी दिली आहे. सोमवारी यासंदर्भातील सूचना अमेरिकी संसदेला देण्यात आल्याचे समोर आले. नव्या शस्त्रास्त्रांमध्ये ‘हायमार्स’ ही रॉकेट यंत्रणा, ‘स्लॅम-इआर’ ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे व ‘एफ-१६’ लढाऊ विमानांसाठी ‘एक्सटर्नल सेन्सर पॉड्स’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ड्रोन्स, हार्पून क्षेपणास्त्रे, स्मार्ट माईन्स व पॅलाडिन हॉवित्झर्स यांच्यासाठीही बोलणी सुरू असल्याची माहिती तैवानने दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरील सहकार्याच्या मुद्द्यावर अधिक सक्रीय भूमिका घेतली आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सुरू केलेले राजनैतिक कार्यालय आणि वाढते संरक्षण सहकार्य या गोष्टी ट्रम्प यांच्या भूमिकेचा भाग मानल्या जातात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, तब्बल तीन दशकांच्या कालावधीनंतर तैवानला लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ तैवानला आधुनिक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो व प्रगत संरक्षण यंत्रणाही पुरविण्यात येत आहेत. अमेरिकेने तैवाननजीकच्या सागरी क्षेत्रातील तैनाती वाढविली असून विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, ड्रोन्स, टेहळणी विमाने व लढाऊ विमाने यांचा वावरही वाढला आहे. हा सर्व घटनाक्रम चीनच्या सत्ताधारी राजवटीला अडचणीत आणणारा ठरला असून, चीनने अमेरिकेला इशारेही दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून तैवानबरोबरील सहकार्य पुढील काळात अधिकच वाढेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेने नव्या शस्त्रविक्रीतून दिले आहेत.

leave a reply