अफगाणी लष्कराच्या कारवाईत 44 तालिबानी ठार

काबुल – अफगाणी लष्कराने नांगरहार आणि फराह प्रांतात केलेल्या कारवाईत 44 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. कतारमधील अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानमधील वाटाघाटींना अवघे काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीतही अफगाणी लष्कर आणि तालिबानमधील संघर्षाची तीव्रता वाढत चालली आहे. अफगाणी लष्कराच्या या तालिबानवरील कारवाईला अमेरिकेचे सहाय्य मिळत आहे.

अफगाणिस्तानच्या लष्कराने पूर्वेकडील नांगरहार आणि नैॠत्येकडील फराह प्रांतात मोठी कारवाई केली. यापैकी गुरुवारी उशीरा तालिबानने नांगरहार प्रांताच्या पाचिरागाम जिल्ह्यातील अफगाणी लष्कराच्या सुरक्षा चौकीवर हल्ला चढविण्याची तयारी केली होती. पण अफगाणी लष्कराला याची माहिती मिळताच येथील वाली नाव भागात अफगाणी लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांना घेरून हल्ले चढविले. अफगाणी लष्कराच्या या कारवाईत 18 तालिबानी दहशतवादी जागीच ठार झाले.

अफगाणी लष्कराच्या या कारवाईला अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांची साथ मिळाली. अफगाणी जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन तालिबानी दहशतवाद्यांवर नेमके हल्ले चढविले गेल्याची माहिती नांगरहारच्या प्रांताधिकार्‍यांनी दिली. त्याआधी अफगाणी लष्कराने इराणच्या सीमेजवळ असलेल्या फराह प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले चढविले.

फराह प्रांतातील तालिबानचे दहशतवादी देखील अफगाणी लष्करावर हल्ल्याची तयारी करीत होते, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. पण त्याआधीच अफगाणी जवानांनी येथील ‘बाला-बोलोक’ जिल्ह्यात केलेल्या कारवाईत तालिबानचे 26 दहशतवादी ठार झाले तर 14 जण जखमी झाले. या कारवाईत अफगाणी लष्कराने तालिबानकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या व्यतिरिक्त तालिबानी दहशतवाद्यांनी खोदलेले तीन भुयारीमार्ग आणि आठ तळ देखील अफगाणी जवानांनी नष्ट करून या जिल्ह्याचा ताबा घेतला.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणी लष्कर आणि तालिबानमधील संघर्षाची तीव्रता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणी लष्कराने कंदहार प्रांतातील तालिबानच्या ठिकाणावर हवाई हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणी लष्करावर हल्ले चढविण्यासाठी ड्रोन्सचा वापर सुरू केल्याचे दावेही करण्यात आले होते.

leave a reply