डिसेंबरमधील ‘जीएसटी’ महसूल विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली – कारोना संकटामुळे लॉकडाऊनंतर विस्कळीत झालेले अर्थचक्र पुन्हा पूर्ववत होत असल्याचे डिसेंबरमध्ये गोळा झालेल्या ‘जीएसटी’ महसूलावरून अधोरेखित होत आहे. डिसेंबर महिन्यात 1 लाख 15 हजार कोटी इतका ‘जीएसटी’ महसूल सरकारला मिळाला आहे. सलग तिसर्‍या महिन्यात जीएसटी महसूल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाला असून अर्थव्यवस्था वेगाने पुर्वपदावर येत असल्यामुळे हे शक्य झाल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

डिसेंबरच्या वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) महसूल 2019 च्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तब्बल 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील डिसेंबर महिन्यात 1 लाख 3 हजार कोटी रुपयांचा जीएसटी महसूल मिळाला होता. यावर्षी डिसेंबर महिन्यात 1 लाख 15 हजार 174 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला आहे. हा आतापर्यंतच एका महिन्यात मिळालेला सर्वाधीक जीएसटी महसूल आहे. याआधील 2019 च्या एप्रिल महिन्यात 1 लाख 13 हजार 866 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तसेच डिसेंबरमध्ये जीएसटी महसूलात झालेली वाढ ही गेल्या 21 महिन्यातील सर्वाधिक वाढ ठरली आहे. नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 4 हजार 963 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल मिळाला होता.

जीएसटी महसूलात झालेली वाढ अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दर्शवत आहे. कोरोना काळात थांबलेले आर्थिक व्यवहार, व्यापारी उलाढाल पुन्हा सुरू झाल्याचे यातून स्पष्ट होते, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तसेच जीएसटी चुकविणार्‍यांवर करण्यात आलेली कारवाई, जीएसटी व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणात हेसुद्धा जीएसटी महसूलात झालेल्या वाढीमागील महत्त्वाचे कारण आहे.

डिसेंबरच्या जीएसटी महसूलात 27,804 कोटी रुपये राज्यांचे जीएसटी अर्थात एसजीएसटीचे आहेत. तसेच 21 हजार 365 कोटी रुपये सेंट्रल जीएसटीचे आहेत. याशिवाय 57 हजार 426 कोटी रुपये इंटिग्रेटेड जीएसटीचे आहेत.

leave a reply