अफगाणी लष्कराच्या कारवाईत शंभरहून अधिक तालिबानी ठार

- तालिबानकडून ४५ अफगाणींचे अपहरण

कारवाईकाबुल – अफगाणी लष्कराने गेल्या ४८ तासात हेल्मंड, कंदहार आणि उरूझगन प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानच्या १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. गेल्या आठवड्याभरात अफगाण लष्कराची तालिबानवरील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. तर तालिबानने देखील हेराप प्रांतात एका बसवर हल्ला चढवून किमान ४५ जणांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

कतारची राजधानी दोहा येथे मंगळवारपासून अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील महत्त्वाच्या वाटाघाटींचे सत्र सुरू होत आहे. अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि तालिबानमधील या वाटाघाटी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. पण त्याआधीच अफगाण लष्कर आणि तालिबानी दहशतवादी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

कारवाई

अफगाणी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शनिवारी तालिबानचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या हेल्मंड प्रांतात केलेल्या कारवाईत किमान ६० दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये तालिबानचे कमांडर्स मुल्ला शफीउल्ला, अब्दुल सलाम यांचा समावेश आहे. तर कंदहार प्रांतातील कारवाईत २८ आणि उरूझगन प्रांतातील हल्ल्यात १८ तालिबानी दहशतवाद्यांचा खातमा केल्याचे, अफगाणी लष्कराने सांगितले. याशिवाय तालिबानच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात लष्कर कारवाई करीत असताना तालिबानने पश्‍चिमेकडील हेरात प्रांतात एका प्रवासी बसवर हल्ला चढविला. शनिवारी सकाळी तालिबानी दहशतवाद्यांनी या बसमधील ४५ जणांना ताब्यात घेतले आहे. पण त्यांच्या सुटकेसाठी अद्याप कुठलीही मागणी केलेली नाही. दरम्यान, अफगाण सरकारने तालिबानशी वाटाघाटी करू नये, अशी मागणी अफगाणी जनता करीत आहे.

leave a reply